नाशिक: आयटी क्षेत्रासाठी प्रामुख्याने पुणे, बंगलोरच नाव घेतलं जातं. त्यांच्या तुलनेत नाशिक मागे आहे पण नाशिकमध्ये सुद्धा २०० पेक्षा जास्त आयटी कंपन्या आहेत. पाच हजार कोटी पर्यंत त्यांची आर्थिक उलाढाल आहे आणि दोन हजार कोटी पर्यंत एक्स्पोर्ट आहे. नाशिकमध्ये साधारणपणे आयटी क्षेत्रात १० हजार रोजगार उपलब्ध आहेत. बंगलोरचा विचार केला तर ७० हजार कंपन्या आहेत, २ लाख कोटी पेक्षा जास्त एक्स्पोर्ट आणि १७ लाखापेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. पुण्यात २५ हजार कंपन्या आहेत तर ६५ हजार कोटी एक्स्पोर्ट आहे आणि ६ लाखाच्या आसपास कर्मचारी काम करतात, असे नाशिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अरविंद महापात्रा यांनी सांगितले.
इंडिया दर्पण फेसबुक लाइव्हमध्ये ते बोलत होते. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. असोसिएशनविषयी त्यांनी सांगितले की, नाशिकमध्ये अनेक लहान आयटी कंपन्या आहेत. लहान कंपन्यांना आवश्यक रिसोर्सेस जमवणे अवघड जाते. तसेच स्टार्टअप कंपन्यांना इन्फ्रास्ट्रक्चर, फायनान्स, मार्केट ऍक्सेसची गरज असते. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन २०१८ साली नाशिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असोसिएशनची स्थापना करण्यात आली. रोजगाराच्या बाबतीत त्यांनी सांगितले की, नाशिकमध्ये दरवर्षी ५ हजारहून अधिक आयटी इंजिनिअर्स शिकून बाहेर पडतात. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नाशिकमध्ये त्यांना जॉब मिळत नाही. आमच्या सर्व्हेनुसार नाशिकमध्ये जे चांगलं टॅलेंट आहे त्यापैकी ८० ते ९०% लोकं बाहेर जातात. नाशिकच टॅलेंट बाहेर जाऊ नये यासाठी नाशिकच्या आयटी कंपन्यांनी प्रगती करणे आवश्यक आहे.
नाशिकला होणाऱ्या आयटी पार्कविषयी ते म्हणाले की, २००२ मध्ये प्रमोद महाजन यांनी STPI सॉफ्टवेअर टेक्निकल पार्ट ऑफ इंडिया याच्या उद्घाटनाने नाशिकमध्ये आयटी क्षेत्राची सुरुवात झाली. पुण्यात याच्या ४-५ वर्षे आधी झाली. आयटीच्या बाबतीत नाशिक पुण्यात फार फरक नव्हता. परंतु त्यानंतर पुण्याने झपाट्याने प्रगती केली. नाशिक बरेच मागे पडले. पुण्यात सरकार प्रमाणे खासगी कंपन्यांनी एकत्र येऊन इन्फ्रास्ट्रक्चर,जागा पुरवली. नाशिकमध्ये नुसतं आयटी हब करून चालणार नाही तर नाशिकचा विकास करायचा असेल तर खासगी आणि सरकारी लोकांनी एकत्र यायला पाहिजे. पुण्याच्या मागे जाऊन काही उपयोग नाही तर नाशिकने स्वतःची ओळख निर्माण करणं आवश्यक आहे.
पुढे ते म्हणाले की, पुणे, बंगलोर, हैद्राबाद ही आयटीची प्रमुख ठिकाणं कशी झाली तर प्रामुख्याने इथे आयटी सर्विसेस कंपन्या आहेत. सध्याच्या काळात बाहेरच्या कंपन्या नाशिकमध्ये येतील आणि कॅम्पस चालू करतील अशी परिस्थिती नाही, कदाचित पुढच्या काही वर्षात येतीलही पण तोपर्यंत आपण प्रगती करणं, आपला बिझनेस वाढवणं गरजेचे आहे. यात दोन प्रकार आहेत एक आयटी सर्विवेस आणि दुसरा प्रोडक्ट कंपनी. वर्ल्ड क्लास प्रोडक्ट कंपन्या नाशिकमध्ये झाल्या पाहिजे. नाशिकच हवामान उत्तम आहे, पाणी मुबलक प्रमाणात आहे, टॅलेंट आहे परंतु या सगळ्याचा वापर करून प्रोडक्ट कंपनी केली तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव होईल. यासाठी लोकं खूप लागत नाही पण चांगले लोकं लागतात. नाशिकच एक उत्तम उदाहरण म्हणजे सुला वाइन्स. भविष्यात नाशिक ऍग्रो टेक, एज्युकेशन टेक या मध्ये नक्कीच प्रगती करू शकतो.
आडगाव भागात विकसित होत असलेल्या आयटी पार्कविषयी ते म्हणाले की, ही चांगली सुरुवात आहे. पण नुसती सुरुवात करून चालणार नाही तर शेवट सुद्धा लक्षात घेतला पाहिजे. शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचण्यासाठी ध्येय निश्चित केले पाहिजे, त्यासाठी आवश्यक असलेले नियोजन महत्त्वाचे आहे. तरुणांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, आज या क्षेत्रात खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत. पण प्रगती करण्यासाठी फोकस ठेवून काम करणे गरजेचे आहे. संधी मिळेल पण टिकून राहणं गरजेचे आहे, संयम राखला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.