मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशांतर्गत पेंट कंपनी शालीमार पेंट्सने नाशिकच्या प्रकल्पाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये कंपनीकडून तब्बल ४० ते ४५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यानुसार, पुढील वर्षी एप्रिल पर्यंत हा प्रकल्प कार्यन्वित होण्याची कंपनीला अपेक्षा आहे.
शालीमार पेंटस ही राइट्स इश्यूद्वारे २०० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. नाशिक युनिटची पुनर्स्थापना करण्यासाठी उत्पन्नाचा काही भाग भांडवली खर्च म्हणून वापरला जाईल, तर मोठा भाग खेळते भांडवल म्हणून वापरला जाईल.योगायोगाने, कंपनीच्या बोर्डाने २४० कोटींहून अधिक किमतीच्या राइट इश्यूला मान्यता दिली आहे.
शालीमार पेंट्सचे उपाध्यक्ष अशोक कुमार गुप्ता यांच्या मते, नाशिकच्या कारखान्यावर अंदाजे ४० ते ४५ कोटी रुपये खर्च केले जातील, ज्याची वार्षिक क्षमता २५ हजार किलोलिटर असेल. एप्रिल-मे २०२३ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. २०१६ मध्ये नाशिकचा कारखाना अंशतः नष्ट झाला होता.
युनिटमधील कामकाजाचे पुनरुज्जीवन हे कंपनीच्या टर्नअराउंड प्लॅनमध्ये केंद्रस्थानी आहे. ज्यामध्ये क्षमता वाढवणे, पश्चिम भारताच्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करणे आणि बाजारपेठेतील हिस्सा पकडणे यांचा समावेश आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत (एप्रिल ते सप्टेंबर) कंपनीने १२३ कोटींची उलाढाल आणि २५ कोटींचा निव्वळ तोटा नोंदवला. “राइट इश्यूची रक्कम डिसेंबरपर्यंत अपेक्षित आहे. पुढील वर्षी एप्रिल-मेपर्यंत नाशिक युनिट पूर्णपणे कार्यान्वित व्हायला हवे. यामुळे आमच्या कामांना वेग आला पाहिजे,” गुप्ता यांनी सांगितले
शालीमार पेंट्सने काही वर्षांपूर्वी आपले नोंदणीकृत कार्यालय कोलकाता येथून गुडगाव येथे स्थलांतरित केले आहे. सध्या चेन्नई (तामिळनाडू) आणि नोएडा (उत्तर प्रदेश) येथे कंपनीचे दोन ऑपरेशनल युनिट्स आहेत. त्यांची एकत्रित क्षमता वार्षिक ५० हजार किलोलीटर (प्रत्येकी २५ हजार किलोलीटर) आहे. २०१४ मध्ये आग लागल्यानंतर हावडा (पश्चिम बंगाल) येथील कारखान्याचे ऑपरेशन्स बंद आहे. बांधकाम पुन्हा सुरू करण्यापूर्वी कंपनी पश्चिम बंगाल सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. “युनिटची क्षमता आणि इतर तपशीलांवर काम केले जात आहे,” असे गुप्ता म्हणाले. दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतारामुळे इनपुट कॉस्ट प्रेशर वाढत असताना, शालिमार पेंट्स वॉटर-बेस्ड पेंट्सचा पोर्टफोलिओ वाढवण्याचा विचार करत आहे. गुप्ता यांनी बिझनेस लाईन आणि इकॉनॉमिक टाइम्स या दैनिकांना मुलाखत दिली आहे. त्यात सर्व माहिती दिली आहे.