नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहर आणि जिल्ह्यातील उद्योजक आणि कामगारांचे प्रश्न आणि तंटे सामोपचाराने आणि सौहार्दाच्या वातावरणात सोडविण्याचा निर्णय निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे आणि सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी.एल.कराड यांच्यात झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला. कामगार आणि उद्योजकांचे नेतृत्व करणाऱ्या या दोन दिग्गज नेत्यांमध्ये झालेल्या या बैठकीमुळे नाशकात उद्योग विश्वात सौहार्दाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
नाशकात विविध उद्योग आणि कामगार संघटनांच्या नेत्यांमध्ये परस्पर मतभेद आहेत असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याने नाशिकच्या उद्योग विश्वाला तो एकप्रकारे धक्का समजला जात होता. नाशकात गुंतवणूक करण्यासाठी येणारे गुंतवणूकदर आपला हात थोडा आखडता घेत होते. परंतु गुंतवणूकदारांचा हा गैरसमज दूर व्हावा आणि नाशकात पुन्हा मोठ्याप्रमाणात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरणनिर्मिती करण्याचा विडा उचलून बेळे आणि डॉ. कराड यांनी नाशिकच्या औद्योगिक विश्वाला नव्या शिखरावर नेण्यासाठी एकत्र आले आहेत.
नाशकात औद्योगिक व कामगार संघटनाच्या नेत्यांमध्ये व कामगार आणि उद्योगांमध्ये ही कोणतीही कटुता नाही आणि सर्वजण परस्पर समंजस्य जोपसतात हा संदेश राज्यातील उद्योग विश्वातील इतर संघटनांना देण्याचा अत्यंत दिशादर्शक व महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याचे बोलले जाते.
पोलिस आयुक्त कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत कामगार आणि उद्योजक यांच्याबद्दल असलेली आस्था आणि निमाचे अध्यक्ष या नात्याने नवीन गुंतवणूक आणण्यासाठी सुरु असलेली धडपड याचे डॉ. कराड यांनी कौतुक केले व श्री धनंजय बेळे यांनी औद्योगिक शांतता समिती ची पुन्हा स्थापना करण्याचे केलेले आवाहन याचेही त्यांनी मनःपूर्वक स्वागत केले, व या समितीच्या माध्यमातून मागील काळात सोडलेल्या प्रश्नांनाही उजाळा दिला,यापुढे कामगार आणि उद्योजकांशी निगडित असलेले छोटेमोठे वाद आणि तंटे आपसात बसून व चर्चा करून समंजस्याने मिटविण्याचा निर्णयही या दोघांच्या बैठकीत झाला.
बैठकी प्रसंगी सिटू चे सचिव श्री प्रमोद सोनजे, श्री देवी दास आडोळे, व शेट्टी हे तर निमाचे सचिव श्री राजेंद्र अहिरे,खजिनदार श्री विरल टक्कर, समिती सदस्य श्री मिलिंद राजपूत,श्री किरण खाबिया,श्री श्रीकांत पाटील, श्री राजेंद्र वडनेरे, श्री कैलास पाटील आदी उद्योजक प्रतिनिधी उपस्थित होते.
Nashik Industry Dhananjay Bele D L Karad Shake Hand