नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कार्यालयावर झालेला हल्ला हा उद्योग जगतावरील हल्ला असून त्याचा निषेध म्हणून शुक्रवार दिनांक 2 जून रोजी नाशिक जिल्ह्यातील सर्व उद्योग बंद ठेवण्याचा तसेच त्यादिवशी काळेफीती व काळे मास्क लावून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय आयमा कार्यालयात झालेल्या सर्व उद्योग व व्यापारी संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.
धनंजय बेळे यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याबाबत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी व हल्लेखोरांवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी आयोजित बैठकीत उद्योजकांच्या विविध घटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या तीव्र व भावना व्यक्त करून संतापाला वाट मोकळी करून दिली. व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ,सरचिटणीस ललित बूब, निमाचे सरचिटणीस राजेंद्र अहिरे, महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष संतोष मडलेचा,एनसीएफचे हेमंत राठी,मनीष कोठारी,आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे,सुदर्शन डोंगरे, राजेंद्र कोठावदे,वरूण तलवार,बीओटी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, विवेक पाटील,इमाचे विष्णू गुंजाळ,निपमचे हेमंत राख, जयप्रकाश जोशी,लोकेश पीचाया, मनीष रावल, विराज गडकरी विजय जोशी, सुमीत बजाज,श्रीलाल पांडे, देवेंद्र राणे, देवेंद्र विभुते, जयंत जोगळेकर, राधाकृष्ण नाईकवाडे, दिलीप वाघ.,कुंदन डरंगे, रवींद्र झोपे,रामचंद्र जोशी, विलास लिधुरे, अविनाश मराठे, अविनाश बोडके, गौरव धारकर,अभिषेक व्यास,राहुल गांगुर्डे, अशोक ब्राह्मणकर, अजय यादव, वैभव जोशी,आदी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक निमाचे सचिव राजेंद्र अहिरे यांनी केले.बेळे यांच्या कार्यालयावर कसा भ्याड हल्ला झाला यामागे कोणकोणत्या शक्ती होत्या त्याची इत्यंभूत माहिती त्यांनी दिली. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते. काही जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले मात्र त्यानंतर चार दिवस उलटूनही पोलीस यंत्रणेकडून कासव गतीने या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्ह्यातील उद्योजक संतप्त झाले. हा अत्यंत संवेदनशील विषय असून उद्योगांच्या सुरक्षेसाठी सर्वांनी एकजूट दाखवण्याचे आवाहन आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ आणि वरून तलवार यांनी केले. हल्लेखोरांना कडक शासन झालेच पाहिजे अशी भूमिका राजेंद्र कोठावदे व लोकेश पिचाया यांनी मांडली.
धनंजय बेळे सर्वांना मदत करतात उद्योजकांबाबत कोणतीही घटना घडल्यास त्यांच्या ते तातडीने मदतीला धावून जातात मग त्यांच्यावर जो प्रसंग उद्भवला तो निंदनीय असून त्याचा सर्वांनी विविध पद्धतीने निषेध केला पाहिजे. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री पालकमंत्री,विरोधी पक्षनेते आदींना निवेदने पाठविली पाहिजेत अशी भूमिका हेमंत राठी, शरयू देशमुख, छावा माथाडी संघटना, जयप्रकाश जोशी,रोशन देशपांडे,मनीष कोठारी,कल्पना शिंपी ज्ञानेश्वर गोपाळे,संतोष मंडलेचा यांनी आपल्या मनोगतात मांडली.
हल्लेखोरांना कडक शासन झालेच पाहिजे उद्योजकांची एकजुटीची वज्रमूठ आहे हा संदेशही राज्यभर पोहोचला पाहिजे आणि ही एकजूट दाखवण्यासाठीच दोन जूनरोजी जिल्ह्यातील सर्व उद्योग बंद ठेवावेत अशी एकमुखी मागणी उद्योजकांनी केली असता उपस्थित सर्वांनी हात उंचावून त्यास अनुमोदन दिले.बैठक ज्या ठिकाणी होती तो हॉल उपस्थित उद्योजकांनी खचाखच भरलेला होता.महिला उद्योजकांची संख्याही लक्षणीय होती व ते या बैठकीचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
Nashik Industry Association Meet