नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महावितरण कंपनीने 67644 कोटी रुपये तुटीच्या भरपाईसाठी 37% म्हणजे सरासरी प्रति युनिट 2 रुपये 55 पैसे दरवाढ मागणीचा सादर केलेला प्रस्ताव सर्वसामान्य जनता तसेच उद्योजकांचे कंबरडे मोडणारा असून ही दरवाढ पूर्णपणे मागे घ्यावी या मागणीसाठी 28 फेब्रुवारीरोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या प्रस्तावाची होळी करण्याचा निर्धार निमा हाऊसमध्ये आयोजित वीज ग्राहक आणि औद्योगिक संघटनांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.अध्यक्षस्थानी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे तर प्रमुख वक्ते म्हणून वीजतज्ञ प्रताप होगाडे होते.
निमा आणि आयमा यांच्या संयुक्त विद्यमाने असयोजित या बैठकीत प्रस्तावित वीजदरवाढीला सर्वांनीच कडाडून विरोध करताना महावितरण, महाजनको आणि महापारेषचया कारभारावर जोरदार ताशेरे ओढले.व्यासपीठावर मुकुंद माळी,सिद्धार्थ सोनी,आयमाचे अध्यक्ष निखील पांचाळ,चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख,ग्राहक संघटनेचे दत्ताजी शेळके,राजेंद्र अहिरे,निमाच्या उर्जा समिती चेअरमन रवींद्र झोपे आदी होते.
महावितरणचे सध्याचेच वीजदर हे देशातील सर्वाधिक आहेत.ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी प्रचंड दरवाढीची मागणी करणारा प्रस्ताव म्हणजे सर्वसामान्य घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांना प्रचंड शॉक देणाराच आहे.राज्यात नव्याने येऊ घातलेल्या उद्योगांना त्यामुळे आळा बसेल.राज्यात सध्या असलेले उद्योग अन्य राज्यात जाण्याची भीती यामुळे वाढणार आहे.ही दरवाढ शेतकऱ्यांना अधिक संकटात टाकणारी आहे. राज्याच्या विकासावर त्याचा गंभीर परिणाम होईल हे लक्षात घेऊन राज्य सरकारने याबाबत काय ती ठाम भूमिका घ्यावी. गांभीर्याने कठोर उपाययोजना करावी व राज्याच्या हिताच्यादृष्टीने ही संपूर्ण दरवाढ रद्द करावी. इतकेच नव्हे तर सध्याचा असलेला वीजदर अन्य राज्यांच्या तुलनेने स्पर्धात्मक पातळीवर खाली आणावा असा सूर या बैठकीत उमटला.
वीज दरवाढीच्या या प्रस्तावाला जास्तीत जास्त हरकती नोंदविता याव्यात यासाठी सुविधा केंद्र सुरू करावेत,हरकती नोंदवण्यासाठी 15 फेब्रुवारी ही अंतिम तारीख असल्याने आत्तापासूनच त्यासाठी पुढाकार घ्या.आतापर्यंत दाखल झालेल्या हरकती या फारच कमी आहेत.त्याचा वेग न वाढल्यास वीज दरवाढीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल आणि नंतर आपण काहीच करू शकणार नाही हे सर्वांनी लक्षात घ्यावे असा इशारा प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणात दिला.
प्रास्ताविक निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी केले चर्चेत सिद्धार्थ सोनी आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ,लघुभरतीचे वामन भानोसे, सुरेंद्र मिश्रा, मुकुंद माळी,दत्ता शेळके, मिलिंद राजपूत आदींनी भाग घेतला. सरकारला भान आणि जाण आणण्यासाठी या विज दरवाढीच्या प्रस्तावाला कडाडून विरोध करा आमदार खासदार मंत्री यांच्यापुढे आपले गाऱ्हाणे मांडा,असे प्रताप होगाडे आपल्या प्रमुख भाषणात म्हणाले. नाशकातून जास्तीत जास्त हरकती गेल्या पाहिजेत असे निमाचे अध्यक्ष बेळे यांनी सांगितले.
28 तारखेला वीजदरवाढ प्रस्ताव होळी आंदोलनाच्या नियोजनासाठी आयमा अध्यक्ष निखील पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णयही यावेळी झाला. यावेळी आयमाचे उपाध्यक्ष सुदर्शन डोंगरे राजेंद्र पानसरे, सरचिटणीस ललित बूब,सहसचिव योगिता आहेर कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे विलास देवळे यांच्यासह वीज ग्राहक आणि औद्योगिक समानव्यय संघटनांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.
Nashik Industrial Organization on Electricity rate Hike