नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकदिवस सर्वांनाच वृध्दापकाळाला सामोरे जावे लागणार आहे. या काळात दैनंदिन आहारविहाराबरोबरच उत्तम आरोग्य आणि सर्व प्रकारचा मानसिक आधार मिळणे खूप महत्वाचे असते. पण वृध्दांची आजच्या काळात होणाऱ्या हेळसांडबद्दल बोलायलाच नको. हे लक्षात घेऊन आयएमए म्हसरूळ परिसरातील विनायक नगर( जुने टि.बी.सॅनेटोरियम) च्या ठिकाणी एमटीबी द्वारा ओल्ड एज होम(वृध्दाश्रम) सुरु करत आहे, अशी घोषणा आयएमए अध्यक्षा डॉ.राजश्री पाटील यांनी केली. हा होम वृध्दांना आधार देईल त्याची देखभाल करेल,असेही त्या म्हणाल्या.
आयएमए संचलित एम.टीबी.एस.द्वारे ओल्ड एज होमची आज डॉ.पाटील यांनी औपचारिक घोषणा केली. यावेळी सचिव डॉ.विशाल पवार,नगरसेवक अरूण पवार, सौ.शालीनी पवार, क्षयरोगतज्ञ,प्रकल्प समन्वयक व जिल्हा हास्य क्लबच्या डॉ.सुषमा दुगड,वुमन डॉक्टर विंगच्या डॉ.शलाका बागुल,डॉ.प्रेरणा शिंदे,अश्विनी धोपावकर आदी उपस्थित होते. यावेळी विविध दानशूरांनी देणगी दिली.
डॉक्टरांनी काढलेला वृध्दाश्रम
शहर परिसरात आयएमए च्या डॉक्टरांनी काढलेला हा एकमेव वृध्दाश्रम आहे. या वृध्दाश्रमात डे-केअर सेंटरद्वारे वृध्दांची सकाळी नऊ ते सहा यावेळेत सर्वप्रकारची काळजी घेतली जाईल, निष्णात डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी बरोबरच येथे त्यांना योग, हास्ययोग, प्राणायाम, चहा, नास्ता, दोन वेळचे पौष्टिक जेवण, आंघोळीसाठी गरम पाणी, वर्तमानपत्र, पुस्तकांची सोय आदी सुविधा अत्यल्प दरात दिल्या जातील. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र टी.बी सॅनेटोरियम,डॉ.काकासाहेब देवधर मार्ग,विनायक नगर,म्हसरूळ, दूरध्वनी-०२५३-२५३०६६६७,९३२६०२५३५१ येथे संपर्क साधावा. डॉ.दुगड यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ.पाटील यांच्यासह डॉ.बागुल,धोपावकर,शांतीलाल दुगड,आनंद सागर हास्यक्लब अध्यक्षचे हिरामण झोटींग यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.शिंदे यांनी आभार मानले.
हास्यप्रेमींचा अनोखा उत्साह
यानिमित्ताने झालेल्या हास्ययोग प्रात्याक्षिकात मेरी-म्हसरूळ परिसरातील हास्यक्लबच्या सदस्यांनी भाग घेतला. त्यांना डॉ.दुगड यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या,‘हास्य हे जगातले सर्वात स्वस्त, मुबलक प्रमाणात मिळणारे व सहज शक्य होईल असे औषध आहे.आपले अनेक विकार, आजार घालविता येतात’ हास्य योग हे प्राणायाम, योग, सूर्य नमस्कार, अॅक्युप्रेशर असे सगळ्यांचे मिश्रण असून खळखळून हसण्याने आपला २२ टक्के रक्त प्रवाह जोरात होतो असेही त्यांनी सांगितले. यावेळी दुगड यांच्यासह विविध हास्यक्लबच्या पदाधिकाऱ्यांनी लायन लाफ्टर, अॅप्रिसिएशन लाफ्टर, क्लॅपिंग, गुरु शिष्य लाफ्टर, तू तू मी मी लाफ्टर, कुलर, अय्या लाफ्टर, लस्सी लाफ्टर, टाक दही लाफ्टर, पडघम लाफ्टर या प्रकारांचे प्रात्यक्षिक दाखविले.