नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात विनापरवानगी वृक्षांवर कुऱ्हाड चालविणाऱ्यांना महापालिकेच्यावतीने चांगलाच हिसका दाखविला जात आहे. त्यामुळेच शहराच्या विविध भागात महापालिकेकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे. त्यापोटी लाखांचा जबर दंडही करण्यात आला आहे.
नाशिकरोडच्या जाचकनगर भागात दोन रेनट्री वृक्षांचा विस्तार विनापरवानगी कमी केल्याचे उपायुक्तांच्या निदर्शनास आले. त्यानुसार सबंधितांना तब्बल १ लाख ४० हजार रुपयांचा दंड केला आहे. तर अजून एका ठिकाणी वृक्ष वाळविण्याच्या दृष्टीने सबंधितांने वृक्षाच्या खोडाभोवती काप दिले. त्याअनुषंगाने सबंधित सोसायटी चेअरमन यांना १ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. सबंधितांनी दंड न भरल्यास सदर दंडाच्या रक्कमेचा त्यांच्या घरपट्टीवर बोजा चढविण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. तसेच नाशिकरोड विभागातील जुना ओढारोड येथे 7 वृक्षांची तोड केल्याबद्दल सबंधितांना तब्बल ४ लाख २० हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
यासंदर्भात महापालिकेने सांगितले आहे की, महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 चे कलम 8 अन्वये कोणत्याही नागरी क्षेत्रावरील (खाजगी/शासकीय) वृक्ष तोडण्यावर प्रतिबंध घातला आहे. परंतु काही वृक्ष धोकादायक झाली असल्याने जिवितांस व वित्तास हानीकारक ठरत असल्याने तोडणे आवश्यक असतात. तर काही वृक्ष ही विकास कामंामध्ये अडथळा ठरत असल्याने तोडणे आवश्यक असतो. अशा परिस्थित अधिनियमातील तरतुदी प्रमाणे वृक्ष तोडणे बाबतच्या प्रस्तावांवर निर्णय होऊन आवश्यकते प्रमाणे वृक्ष तोडण्याकरीता भरपाई वृक्ष लागवड करण्याच्या अटीवर वृक्ष तोडणेस मंजुरी दिली जाते.
परंतु सध्या असे आढळुन आले आहे की, नागरीक व विकासक हे वृक्ष तोडणेकरीता परवानगी न घेता परस्पर वृक्षतोड करता किंवा वृक्षांचा विस्तार कमी करतात. विनापरवानगी व अवैधरित्या वृक्षतोडल्यास वृक्ष कायदा 1975 चे कलम 21 नुसार विनापरवानगी वृक्ष तोड करण्यास दंड करणेची व सोबतच गुन्हा दाखल करणेची तरतुद करण्यात आलेली आहे. त्यानुसार प्रति वृक्ष जास्तीत जास्त 1 लक्ष रुपयांपर्यत दंड होवु शकतो. तसेच 1 आठवडयापासुन 1 वर्षापर्यत कारावासाची शिक्षा होऊ शकते. तरी उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी धोकादायक व बांधकाम बांधित वृक्षांची तोड करणे करीता अथवा त्यांची छाटणी करणेकरीता रितसर परवानगी घ्यावी अन्यथा त्यांचेवर कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा मनपाने दिला आहे. तरी नाशिककरांनी पर्यावरण संवर्धन व संरक्षण होण्याच्या दृष्टीने विनापरवानगी वृक्षतोड अथवा वृक्षांची छाटणी करु नये असे आवाहन उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत नागरीकांना करण्यात येत आहे.