इगतपुरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील खंबाळे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेची हत्या करण्यात आली आहे. तत्पूर्वी या महिलेवर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी महिलेच्या नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून आंदोलनही करण्यात आले आहे.
घोटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरी तालुक्यातील खंबाळे परिसरात ४५ वर्षीय विवाहितेचा खून केल्याची घटना घडली आहे. दुपारच्या सुमारास ही महिला कपडे धुण्यासाठी खदाणीच्या पाण्याकडे गेली. त्याचवेळी या विवाहितेवर काही जणांनी पाळत ठेवली. मद्यपान केलेल्या काही जणांनी या महिलेची हत्या केली. मात्र, या महिलेवर आधी अत्याचार करण्यात आल्याची कुटुंबियांची तक्रार आहे.
परिसरातील नागरिकांनी एका संशयताला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. तर दोघे जण फरार झाल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली आहे. घोटी पोलीस स्टेशनचा आवारामध्ये ग्रामस्थांचा मोठा जमाव जमला. या महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनच्या आवारात बसू असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. तब्बल ७ तास ग्रामस्थांनी पोलिस स्टेशन बाहेर ठिय्या दिला. अखेर याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
Nashik Igatpuri Women Rape Murder