इगतपुरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ग्रामीण आणि दुर्गम भागातील अतिशय भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. रस्ता नसल्याने गरोदर मातेसह अर्भकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तालुक्यातील या घटनेमुळे सरकारचे पितळ उघडे पडले आहे. तसेच, आजवर आदिवासी भागात झालेल्या कोट्यवधींचा खर्चही पाण्यातच गेल्याचे स्पष्ट होत आहे.
रस्त्या अभावी गरोदर मातेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना इगतपुरी तालुक्यात घडली आहे. केवळ रस्त्या अभावी गरोदर मातेचा मृत्यू झाला आहे. वनिता भगत (वय २३) असे मृत गरोदर महिलेचे नाव आहे. भगत कुटुंब हे जुनावणे वस्ती येथे राहतात. या गरोदर महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्या. त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. वनिता यांना रुग्णालयात नेण्यासाठी कुटुंबियांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. वस्तीला जोडणारा रस्ताच नाही. त्यामुळे कुटुंबियांनी भर पावसात झोळी करून तब्बल साडेतीन किलोमीटर अंतर पायपीट सुरू केली. मात्र, वाटेतच गरोदर महिला आणि अर्भकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा केला जात आहे. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. असे असताना गेल्या ७५ वर्षात दुर्गम आणि आदिवासी भाग हा सोयी-सुविधा आणि विकासापासून वंचित असल्याचे जळजळीत वास्तव .या निमित्ताने समोर आले आहे. महिलेसह अर्भकाच्या मृत्यूमुळे जुनावणे वस्तीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे तरी सरकार आणि प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.