नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इगतपुरी तालुक्यातील परदेशीवाडी येथील करवंदे विक्रीसाठी आलेल्या गतिमंद अल्पवयीन मुलीला फूस लावून जळगाव जिल्ह्यात एक लाख रुपयात विक्री केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयित महिलेसह दोन जणांना घोटी पोलीस अटक केली आहे.
परदेशीवाडी येथील माहेर असलेली महिला सुरेखा योगेश पाटील हिची करवंदे खरेदी करताना एका अल्पवयीन गतिमंद मुलीची ओळख झाली. त्यानंतर या महिलेने पती योगेश शांताराम पाटीलच्या संगनमताने मुलीला घोटी येथून जळगाव जिल्ह्यात नेले. या जिल्ह्यातील कासोदा येथे मनोज राजू शिंपी यास एक लाख रुपयात विक्री करुन घरात लग्न लावून दिले. त्यानंतर या मुलीवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार करण्यात आले.
दुसरीकडे पीडित मुलगी बेपत्ता झाल्यानंतर घोटी पोलीस ठाण्यात पालकांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर नवनियुक्त पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी गुप्त माहितीद्वारे सदर मुलीचा शोध घेऊन संशयितांना अटक केली. गतिमंद असलेल्या मुलीला घराचा पत्ता सांगता येत नसल्याने तिच्यावर महिनाभर अत्याचार झाला. नीट बोलता येत नसल्याने तिला मदतीला कुणालाही बोलावता येत नसल्याचेही समोर आले आहे.