नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरासह जिल्ह्यात लाचखोरीचे पीक चांगलेच फोफावले आहे. आज सकाळीच निफाड तालुक्यातील तिघे जण उत्पादन शुल्क विभागाच्या हप्तेखोरीच्या प्रकरणात सापडले आहेत. त्यानंतर आता इगतपुरी तालुक्यातील सरपंचासह ग्रामसेविका आणि खासगी एजंट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडले आहेत. या तिघांनी तब्बल ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, लाच घेणाऱ्यांमध्ये आशा देवराम गोडसे (वय ३७, ग्रामसेविका बलायदुरी ग्रामपंचायत, तालुका इगतपुरी), हिरामण पांडुरंग दुभाषे (वय २५, सरपंच, बलायदुरी ग्रामपंचायत) आणि मल्हारी पंढरीनाथ गटकळ (वय ५६, रा. बलायदुरी) यांचा समावेश आहे. बलायदुरी ग्रामपंचायतीतील हे लाचखोरीचे प्रकरण आहे.
बलायदुरी ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून सेवा बजावल्यानंतर जून २०२० मध्ये ते निवृत्त झाले. बलायदुरी ग्रामपंचायतीकडे १ लाख ६४ हजार ६८२ रुपये एवढा राहणीमान भत्ता बिलाची रक्कम थकीत होती. हा राहणीमान भत्त्याचा धनादेश बनवून देण्यासाठी गोडसे, दुभाषी आणि गटकळ यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली. एसीबीने सापळा रचला आणि त्यात गोडसे, दुभाषे आणि गटकळ हे तिन्ही रंगेहाथ सापडले. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
एसीबीच्या पथकामध्ये पोलिस निरीक्षक संदीप घुगे, पोलिस उप अधिक्षक वैशाली पाटील, पोलिस हवालदार एकनाथ बाविस्कर,
हवालदार राजेंद्र जाधव, पोलिस नाईक शरद हेंबाडे, पोलिस शिपाई नितीन नेटारे आणि चालक हवालदार संतोष गांगुर्डे यांचा समावेश होता. पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे आणि पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
एसीबीच्यावतीने सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.
Nashik Igatpuri ACB Raid Trap Bribe Corruption