नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात आज एक धक्कादायक घटना घडली आहे. एका घरामध्ये एकाचवेळी कोब्रा नागाची तब्बल ५ पिल्ले आढळून आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. हा सर्व प्रकार डिजीपी नगर २ येथील केवल पार्क भागात घडला आहे.
केवल पार्कमधील एका घरात नागाच्या कोब्रा जातीची विषारी ५ पिल्ले आढळल्याने सर्वांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. पण, सर्पमित्राने ते शिताफीने पकडल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. डीजीपी नगर २ मधील अष्टविनायक नगर, केवल पार्क येथे गजानन ताठे यांच्या रो हाऊसमध्ये ही सापाची पिल्ले आढळली. त्यानंतर ताथे यांनी सर्पमित्र तुषार गोसावी यांना माहिती दिली. त्यानंतर गोसावी यांनी मोठ्या शिताफिने ही पिल्ले पकडली.
या घराच्या चेंबर जवळ डग मध्ये नागीण होती. मात्र तिच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी घुशीने केलेल्या बिळाच्या मार्गाने नागीण पसार झाली. टॉयलेटमधील जाळीच्या मार्गाने ही पिल्ले किचनमध्येही शिरली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशीं बेडरूममध्ये काही पिल्ले आढळली. एकुण पाच पिल्ले पकडण्यात आली. कोब्रा जातीच्या विषारी नागाची ही पिल्ले आहेत. नागीण एकावेळी दहा ते बारा पिल्ले देते. त्यामुळे आणखी काही पिल्ले आहेत का याचा शोध घेतला जात आहे.