नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धार्मिक, औद्योगिक आणि पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला आलेले नाशिक हे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातही वेगाने विकास करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच फाईव्ह स्टार हॉटेलची मुहूर्तमेढ नाशकात रोवली गेली आहे. त्यातच आता अनेक प्रख्यात आणि बहुराष्ट्रीय ब्रँड नाशिकमध्ये इच्छुक असून येत्या ५ वर्षात तब्बल १२०० हून अधिक नवीन रुम्स तयार होणार आहेत. त्यामुळे ही बाब नाशिकच्या विकासाला आणखी गती देणार आहे.
पंचवटी, त्र्यंबकेश्वर, सप्तशगृंगगड आणि शिर्डी या चार तीर्थस्थळांमुळे नाशिक हे पर्यटनाच्या क्षेत्रावर अधिक ठळकपणे दिसते. मात्र, कालौघात नाशिकमध्ये आध्यात्मिक, साहसी, आरोग्य आणि अन्य स्वरुपाच्या पर्यटनाने वेग घेतला आहे. इगतपुरीतील विपश्यना केंद्र असो की साहसी पर्यटनासाठीचे सुळके आणि गड यामुळे असंख्य पर्यटक नाशिककडे आकृष्ट होत आहेत. सुला विनयार्ड आणि सुला फेस्टने नाशिकच्या पर्यटनाला जगभर नेले आहे. त्यामुळे दिवसागणिक नाशिकच्या पर्यटनात वाढ होत आहे. आता तर नाशिकला पर्यटन जिल्ह्याचा दर्जा देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच एक बैठकही घेतली आहे. पर्यटन व्यवसायाचा मुख्य कणा समजल्या जाणाऱ्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचाही झपाट्याने विकास होत असल्याचे दिसून येत आहे.
हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील तज्ज्ञ तेज टकले म्हणाले की, नाशिक हे पर्यटनासाठी अत्यंत उत्तम स्थळ आहे. रस्ते, महामार्ग आणि रेल्वेचे उत्तम जाळेही नाशिकला आहे. आता विमानसेवेनेही गती घेतली आहे. दळणवळणाच्या सुविधा जशा भक्कम होत आहेत तसे नाशकातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात वेगाने विकसित होत आहे. आगामी काळही या क्षेत्रासाठी उज्ज्वल आहे.
सध्याच्या रुम्स
सद्यस्थितीत नाशिकमध्ये असलेल्या मोठ्या हॉटेल्समध्ये ११०० पेक्षा जास्त रुम्स उपलब्ध आहेत. त्यात तीन फाईव्ह स्टार हॉटेल्सचा समावेश आहे. शहरातील प्रमुख हॉटेल्समध्ये मॅरिएट कोर्टयार्ड, ताज द गेटवे, रेडिसन, एक्सप्रेस इन, आयबीएस, जिंजर, बीएलव्हीडी आणि पाम स्प्रिंग यांचा समावेश आहे.
येऊ घातलेले हॉटेल्स
ताजचे विवांता हा ब्रँड असलेले २०० रुम्सचे हॉटेल द्वारका येथे येऊ घातले आहे. पुढील दोन वर्षात ते सेवेमध्ये रुजू होईल. त्यापाठोपाठ हयात, हिल्टन, नोवोटेल आणि फोर पॉईंटस बाय शेरटन हे दिग्गज ब्रँढही नाशकात येऊ घातलेले आहेत. त्याचबरोबर इंदिरानगर अंडरपास येथे असलेल्या मनोहर गार्डन येथे शंभराहून अधिक रुम्सचे हॉटेल येत्या काही महिन्यातच कार्यन्वित होत आहे. म्हणजेच, येत्या पाच वर्षात नाशिकमध्ये १२०० ते १५०० नवीन हॉटेल रुम्स पर्यटकांसाठी उपलब्ध असतील. या हॉटेल्सच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या १० हजार रोजगार उपलब्ध होणार आहे. तर, कोट्यवधींची गुतवणूकही नाशकात होणार आहे.