नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्राचीन काळापासून वैभवाचे प्रतीक असणारा “अश्व” अर्थात ‘घोडा’ हा गेल्या काही काळात क्वचितच चर्चिला जाणारा विषय. सैन्यातील अश्वदळात महत्वाची भूमिका असो, तांड्याची वाहतूक असो, टांग्यातील सफर असो, घोड्यांची शर्यत असो, पोलो सारखे खेळ असो किंवा रेसकोर्स मधील भरधाव वेग, घोडा हा नेहमीच लक्षवेधी आणि जिव्हाळ्याचा विषय ठरत आहे. या अनुषंगाने क्रीडा क्षेत्रात देखील घोड्याचा मोठ्या प्रमाणात सहभाग नेहमी पाहायला मिळतो.
ह्याच धर्तीवर नाशिकमध्ये एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा परिषद-नाशिक, काऊंटी रँच-नाशिक, हॉर्स रायडर्स नेट-लोणावळा व्हेन्यू पार्टनर ग्रेप काऊंटी रिसॉर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “एन्ड्युरन्स प्रीमियर लीग २०२२” चे आयोजन करण्यात आले आहे. “एन्ड्युरन्स प्रीमियर लीग” ही संपूर्ण भारतभरात प्रथमच सादर होत असलेला अतिशय अनोखी स्पर्धा असून याचे आयोजन शुक्रवार दिनांक २४ जून ते २६ जून २०२२ या दरम्यान ग्रेप काऊंटी रिसॉर्ट, त्र्यंबकेश्वर रोड येथे करण्यात आले आहे.
स्पर्धेची रूपरेषा –
वार – शुक्रवार दिनांक २४ जून २०२२ – दिवस पहिला
वेळ – सकाळी ९ ते सायंकाळी ५
अश्वांचे आगमन व नोंदणी
वार – शनिवार दिनांक २५ जून २०२२ – दिवस दुसरा
वेळ – सकाळी ९ ते दुपारी १२ – अश्वांची शर्यतीपूर्वीची आरोग्य तपासणी,
दुपारी ३ पासून पुढे – स्पर्धेची माहिती व मार्गाचे अवलोकन व उदघाटन सोहळा
वार – रविवार दिनांक २६ जून २०२२ – दिवस तिसरा
वेळ – सकाळी ६ ते १० वा
एन्ड्युरन्स प्रीमियर लीग सुरवात, दुपारी बक्षीस वितरण समारंभ
स्पर्धेचे स्वरूप –
एन्ड्युरन्स प्रीमियर लीगचा मार्ग २२ किलोमीटर इतका असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील “द तेवीस कप” या स्पर्धेच्या धर्तीवर याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येकी ४० ते ५० स्पर्धकांचा समावेश असणारे एकूण ८ संघ, हे संपूर्ण देशभरातून या स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आले आहेत. आयोजकांनी एन्ड्युरन्स प्रीमियर लीगचे सूक्ष्म नियोजन करतांना नियमांच्या माध्यमातून स्पर्धकांबरोबरच सहभागी होणाऱ्या अश्वांच्या सुदृढतेची व आरोग्याची विशेष काळजी घेतली आहे, असे दिसून येते.
यामुळे या क्रीडाप्रकाराचा जास्तीत जास्त आनंद सर्वांना मिळेलच पण त्याचबरोबर भूतदयेचे देखील अनोखे उदाहरण सर्वांसमोर प्रकट होईल. अश्वाचा आणि त्यावर स्वार असणाऱ्या अश्वरोहकाचा आपसांतील कौतुकास्पद समन्वय यानिमित्ताने बघायला मिळणार यामुळे सर्वत्र एक प्रकारे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरवेळी अनोख्या उपक्रमांनी आपले वेगळेपण सिद्ध करणारे नाशिक शहर, या “एन्ड्युरन्स प्रीमियर लीग” च्या निमित्ताने पुन्हा एकदा संपूर्ण देशभरात चर्चेत आले आहे.
“अश्वाचे महत्व लोकांना कळावे, हा क्रीडा प्रकार लोकांना माहित व्हावा व लोकसहभागातून याची जनजागृती व्हावी या उद्देशाने आम्ही या स्पर्धेचे आयोजन करत आहोत या माध्यमातून लहान मुलांना देखील या क्रीडा प्रकारची गोडी लागेल याची आम्हाला खात्री आहे”
– डॉ. अर्जुन गुंडे – अतिरिक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक
“या कार्यक्रमाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता पुढील वर्षी देखील याहून मोठ्या प्रमाणात आम्ही कार्यक्रमाचे आयोजन करणार आहोत हि घोषणा मी यानिमित्ताने येथे करत आहे.”
– समीर खान,संस्थापक, काऊंटी रँच स्टड फार्म, नाशिक.
nashik horse riding competition endurance premier league