नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वाढत्या महागाईमुळे घरांच्या किंमतीही गगनाला भिडत आहेत. अशातच अता परवडणारी तब्बल ५ हजार घरे नाशिकमध्ये उपलब्ध होणार आहेत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीच यासंदर्भात गोड बातमी दिली आहे.
मंत्री आव्हाड यांनी नाशिकमध्ये म्हाडाच्या घरांबाबत एक महत्त्वाचे ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, २०१३ ते २०२२ या काळात नाशिकमध्ये म्हाडाला केवळ १५७ घरे मिळाली होती. इतक्या कमी प्रमाणात घरे कशी असू शकतात, असा प्रश्न उपस्थित झाला. हा काहीतरी मोठा घोटाळा असल्याचे लक्षात आले. त्याआधारेच चौकशी करण्यात आली. त्यामुळेच आजपर्यंत म्हाडाला २०३१ घरे प्राप्त झाली आहेत. या घरांची सोडत येत्या मे आणि जून महिन्यात काढण्यात येणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले आहे. नजिकच्या काळात जवळ जवळ ५ हजार घरे उपलब्ध होतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. मी स्वतः लॉटरी काढणार आहे. हा कार्यक्रम नाशिकमध्ये होणार आहे.
नाशिकमध्ये 2013 ते 2022 पर्यंत 157 घरे म्हाडाला मिळाली होती. ह्यामध्ये काहीतरी घोटाळा आहे असे माझ्या ध्यानी येताच चौकशी सुरु केली. आजमितीपर्यंत 2031 घरे म्हाडाला प्राप्त झाली आहेत. आणि त्याची सोडत व लॉटरी मे आणि जून महिन्यात करण्यात येणार आहे. pic.twitter.com/cvQIFcvUpJ
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 20, 2022