नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दुचाकी धारकांना हेल्मेट वापरण्याबाबत प्रबोधन करण्यात यावे परंतु त्याची सक्ती करण्यात येऊ नये असे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना पाठविले आहे.
नाशिक शहरात दिवसेंदिवस वाहनधारकांची संख्या वाढत असल्याने रहदारी सुद्धा वाढत आहे. अशात दुचाकीधारक हेल्मेट घालून दुचाकी चालविताना अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. हेल्मेट घातल्याने दुचाकीधारकांना मागील वाहनांचा अंदाज येत नसल्याने अपघात घडतात. मनपा हद्दीतील रस्त्यांवर खड्डे असल्याने दुचाकीधारकांना मान,पाठ व मणक्याचे आजार होत आहे. तर काहीना कायमस्वरूपी मणक्याचा आजार जडत आहे. तसेच शहरातील रहदारी जास्त असल्याने दुचाकीचा वेग हा जास्त नसतो. कामानिमित्त बाहेर जाणाऱ्यां नागरिकांना हेल्मेट सांभाळणे जिकरीचे बनले आहे. घराजवळील परिसरात जाताना सुद्धा हेल्मेट वापरणे नागरिकांना कठीण होत आहे. हेल्मेटमुळे सोनसाखळी चोरी, दरोडा, भुरट्या चोऱ्या या सारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे.
नाशिक शहरात हेल्मेट वापरण्याकरिता प्रबोधन करण्यात यावे परंतु त्याची सक्ती करणे थांबवावे. शासकीय कार्यालयात आलेल्या नागरिकांना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रबोधनाद्वारे हेल्मेटचे महत्व पटवून द्यावे. प्रबोधनाद्वारे हेल्मेट वापराचे फायदे व दुष्परिणाम सांगण्यात यावे. महामार्गावर हेल्मेटसक्ती योग्य असून शहरात व रहदारीच्या ठिकाणी वाहनाचा वेग कमी असलेल्या जागी हेल्मेटसक्ती करण्यात येऊ नये. असे पत्रात नमूद केले आहे.