नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईमध्ये गोवर आजाराने धुमाकूळ घातल्यानंतर आता नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात गोवरचे चाळीसहून अधिक रुग्ण आढळल्याचे समोर आले होते. आता मालेगावनंतर नाशिक शहरातही गोवरचे चार संशयित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
गोवर आजाराचा धोका वाढला असून राज्यभर जनजागृती केली जात आहे. सर्व जिल्ह्यांमधील आरोग्य यंत्रणा सजग झाली आहे. आता नाशिक शहरात चार संशयित रुग्ण आढळून आले असून त्यामध्ये त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहे. रक्ताचे नमुने मुंबईला पाठविण्यात आले आहे. गोवरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास संपूर्ण शहरात सर्वेक्षण केले जाणार आहे. गोवरचा धोका वेळीच रोखण्यासाठी नाशिकमध्ये आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यातील काही मोजक्याच शहरात गोवरचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा वेळीच उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारून उपाययोजना करत आहे. मालेगावमध्ये सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून अनेकांनी यामध्ये लस न घेतल्याने गोवरचे रुग्ण आढळून आल्याचा निष्कर्ष काढला गेला आहे. त्यामध्ये आता नाशिकमधील स्थिती बघता मुंबईवरुण चार संशयितांचे अहवाल कधी येतात याकडे आरोग्य यंत्रणेचे लक्ष लागून आहे. नाशिक महानगर पालिका आणि जिल्हा परिषद यांच्या आरोग्य विभागाने आशा, सर्वेक्षण अधिकारी यांच्यामार्फत ही स्थानिक पातळीवर आढावा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
आरोग्य यंत्रणेला माहिती द्या..
गोवरची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेला माहिती द्या, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ताप, सर्दी आणि खोकला आला तरी त्या बाळाचे निरीक्षण केले जात आहे. ज्या बालकांचे लसीकरण झालेले नाहीत, अशा बालकांचा शोध घेतला जात आहे, त्यांना लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून मुंबईतून संशयित बालकांचा अहवाल काय येतो यावर पुढील कार्यवाही अवलंबून असणार आहे. कोविड काळात अनेक बालकांना लसीकरण देण्यास पालकांनी टाळाटाळ केल्याची चर्चा होती, त्यात गोवरची साथ आल्याने पालकांमध्येदेखील घबराट निर्माण झाली आहे.
Nashik Health Measles Disease Symptom Patients Suspects