नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात थैमान घातलेल्या गोवर या साथरोगाने नाशिक जिल्ह्यातही शिरकाव केला असून ग्रामीण आणि शहरी भागात एकूण १३ संशयित आढळून आले आहेत. संबंधितांचे नमुने तपासणीसाठी मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ.हर्षल नेहते यांनी दिली.
नागरिकांना दोन वर्ष कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी संघर्ष करावा लागला. यात बालकांपासून ते वृद्धांपर्यंत साऱ्यांनाच सामोरे जावे लागले. या संसर्गजन्य आजारातून काही अंशी दिलासा मिळत असतानाच आता गोवरच्या साथीने डोके वॉर काढले आहे. साधारणतः लहान बालकांमध्ये आढळून येणाऱ्या या आजाराने राज्यात थैमान घातले आहे. काही ठिकाणी तर या आजाराचा संसर्ग होऊन बालके दगावलीही आहेत. कालपर्यंत या आजारापासून लांब असलेल्या नाशिक जिल्ह्यात शिरकाव झाला असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने शोध सुरु केल्यानंतर ग्रामीण भागात आठ आणि शहरी भागात पाच संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यात काही बालके तीन वर्षाची आहेत तर बारा वर्ष वयोगटातील एका बालकाचाही संशयितात समावेश आहे. या बालकांचे नमुने घेऊन ते मुंबई येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. नेहते यांनी दिली. सध्या तरी ही सर्वच बालके संशयित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांना गोवरची लागण झाली आहे किंवा नाही हे समजणार आहे.
अशी घेतली जाते काळजी
गोवरचे संशयित म्हणून समोर आलेल्या बालकांचे तांबडतोड विलगीकरण केले जात आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये त्यांच्यावर उपचारही केले जात आहेत. याठिकाणी औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच त्यांचे तातडीने लसीकरण केले जात आहे. पाच वर्षाआतील जी बालके विविध प्रकारच्या लसीकरणापासून वंचित राहिली आहेत, अशा बालकांचा शोध घेऊन त्यांचेही लसीकरण केले जात आहे.
अशी आहेत लक्षणे
गोवर हा साधारणतः बालकेच गोवाराचे लक्ष ठरत आहेत. ताप, थंडी, सर्दी, खोकला, अंगावर पुरळ, अशी या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.
ग्रामीण भागात सर्वेक्षण सुरु आहेत. त्यात आठ संशयित आढळून आले असून त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. लसीकरणावर भर दिला जात असून रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
– डॉ. हर्षल नेहेते, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद
Nashik Health Measles Disease Rural Suspected Patients