नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूवर केंद्र शासनाकडून ५ टक्के जीएसटी लागू होणार आहे. त्याबाबतचे नोटिफिकेशन 13 जुलै रोजी काढले असून 18 जुलै पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयाविरोधात नाशिकमधील सर्व घाऊक व किरकोळ व्यापारी संघटनांची बैठक महाराष्ट्र चेंबरचे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यात येत्या शनिवारी (16 जुलै) रोजी बंद करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. त्यानुसार आज शहरातील सर्व किराणा दुकाने बंद राहणार आहेत.
उत्तर महाराष्ट्र शाखा चेअरमन कांतीलाल चोपडा यांनी सर्वांचे स्वागत केले व केंद्र सरकारतर्फे ५ टक्के जीएसटी लागू करण्याच्या निर्णयास महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मुंबईत राज्यस्तरीय व्यापारी संघटनांची बैठक घेऊन अन्नधान्यावरील वस्तूवर पाच टक्के जीएसटीच्या निर्णयास तीव्र विरोध दर्शविला असल्याचे सांगितले.
उपाध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी प्रास्ताविकात महाराष्ट्र चेंबरची भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत व्यापारी संघटनांची राज्यस्तरीय बैठक झाली व महाराष्ट्र चेंबर सर्व व्यापारी संघटनांना बरोबर घेऊन तीव्र विरोध करत असल्याचे सांगितले.
नाशिक धान्य घाऊक किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल संचेती यांनी केंद्र सरकारने अन्नधान्य अन्नधान्यावर लावलेल्या ५ टक्के जीएसटी मुळे व्यापारी, सामान्य नागरिक, शेतकरी या सर्वांचे नुकसान होणार असून दुकानदारांना याचा मोठा त्रास होणार आहे. त्यामुळे या निर्णयास रखर विरोध करणे आवश्यक असल्याचे सांगितले व दिनांक 16 जुलै रोजी एक दिवसीय लाक्षणिक बंद करण्याचे आवाहन केले.
नाशिक धान्य किरकोळ किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश मंत्री यांनीही या निर्णयामुळे छोट्या किराणा दुकानदारांचे नुकसान होणार असल्याचे सांगून सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शविला. महाराष्ट्र चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र शाखा को चेअरमन संजय सोनवणे यांनी केंद्र शासनाच्या ५ टक्के जीएसटी आकारण्याच्या निर्णयामुळे होणारे परिणामांची माहिती उपस्थित त्यांना दिली व विरोध करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
याप्रसंगी झालेल्या चर्चेमध्ये कार्यकारणी सदस्य राजाराम सांगळे, व्हीनस वाणी, किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष माजी अध्यक्ष महेंद्र पटेल, शेखर दशपुते, सिडको व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नाना जाधव यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले. याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, उत्तर महाराष्ट्र शाखा चेअरमन कांतीलाल चोपडा,को चेअरमन संजय सोनवणे, कार्यकारी सदस्य राजाराम सांगळे, नाशिक धान्य घाऊक किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल संचेती, नाशिक धान्य किरकोळ किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश मंत्री, माजी अध्यक्ष महेंद्र पटेल, शेखर दशपुते, सहसचिव प्रभाकर गाडे, कार्याध्यक्ष संतोष राय, भिका लाल कोठावदे, महेंद्र डी. पटेल निवृत्ती शिरोडे, नाना जाधव भास्कर पवार आदींसह व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Nashik Grocery Shop Closed Today GST rates Hike