नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – द्राक्ष उत्पादक शेतक-यांना गंडा घालणा-या बिहारी व्यापा-यास ग्रामिण पोलिसांना गजाआड केले आहे. मोहम्मद अन्वर शाह (४५ रा.सीतीमढी,बिहार) असे अटक केलेल्या संशयित व्यापा-याचे नाव आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात संशयिताने हस्तेदुमाला शिवारातील सहा शेतक-यांकडून द्राक्ष खरेदी करून ४९ लाख १९ हजार ५२ रूपयांची फसवणूक करुन पोबारा केला होता. या फसवणुकीबाबत गणेश बबनराव महाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर हा संशयित बिहार, गुजरातसह मुंबईत लपत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर वणीचे सहाय्यक निरीक्षक निलेश बोडखे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने संशयिताचा शोध सुरु केला. त्यानंतर तो कल्याण तालुक्यातील बनेली गावात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर वणी पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने बनेली गावात धाव घेत संशयितास अटक केली.
न्यायालयाच्या आदेशाने ताबा
अटक केल्यानंतर संशयिताच्या अंगझडतीत दोन गावठी कट्टे मिळून आले. त्यामुळे कल्याण तालुका पोलिसांनी त्यास आर्म अॅक्टनुसार अटक केली. सदर गुन्ह्यात संशयिताला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने तो जिल्हा कारागृहात दाखल होताच वणी पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने त्याचा ताबा घेतला. दिंडोरी न्यायालयाने त्यास बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक प्रविण उदे करीत आहेत.