नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार रिंगणात असताना आता वंचितचाही उमेदवार उतरला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील बिघाडी स्पष्टपणे दिसायला लागली आहे.
नाशिकच्या निवडणुकीत सत्यजित तांबे अपक्ष लढत आहेत. त्यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे भाजपवर नाराज झालेल्या शुभांगी पाटील पहिले अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या. आणि नंतर उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून त्यांचा प्रचार सुरू झाला. दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे तिन्ही पक्ष शुभांगी पाटील यांच्या पाठिशी उभे असताना शिवसेनेशी युती करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार या निवडणुकीत उतरवला. त्यामुळे उद्धव ठाकरे नेमके कुणासोबत आहेत, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. वंचित बहुजन आघाडीने रतन बनसोडे यांना उमेदवारी दिल्यानतंर एखाद्या राजकीय पक्षाचा पहिला अधिकृत उमेदवार या निवडणुकीत बघायला मिळत आहे. कारण सत्यजित तांबे अपक्ष आणि शुभांगी पाटील महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार आहेत.
शुभांगी पाटील संभ्रमात?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाठिंबा मिळविल्यानंतरही वंचितचा उमेदवार रिंगणात उतरल्याने शुभांगी पाटील संभ्रमात आहेत. कारण वंचितचे उमेदवार रतन बनसोडे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. शिवाय शिवसेनेसोबत युती झाल्यामुळे त्यांना प्रतिसादही चांगला मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या पारड्यात बरीच मतं जातील, असा अंदाज व्यक्त आहे. अश्यात या समीकरणाचा फटका शुभांगी पाटील यांनाच बसण्याची शक्यता आहे.
भाजप कुणासोबत?
या निवडणुकीत भाजप व शिंदे गटाने कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. तसेच आपला अधिकृत उमेदवारही रिंगणात उतरविलेला नाही. अश्यात स्वराज्य संघटना पुरस्कृत उमेदवार सुरेश पवार यांनी भाजप आपल्याला पाठिंबा देईल असे म्हटले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या माध्यमातून भाजप व शिंदे गटासोबत चर्चा सुरू असल्याचे ते म्हणत आहेत.
काँग्रेसचं काय चाललंय?
डॉ. सुधीर तांबे यांनी स्वतःच्याच पक्षाची अर्थात काँग्रेसची उमेदवारी नाकारली आणि मुलाला अपक्ष उभे केले. काँग्रेसमध्ये पहिली बंडखोरी झाली. त्यानंतर आता काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील सत्यजित तांबे यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये नेमके काय चालले आहे, असा प्रश्न पडू लागला आहे. राहूल गांधी यांनी भारत जोडो यात्रा तर केली, पण काँग्रेसला कसे जोडून ठेवायचे हा प्रश्न काही सुटलेला नाही.
Nashik Graduate Election Politics Mahavikas Aghadi Confusion