नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतदानाची प्रक्रीया 30 जानेवारी रोजी सुरळीतपणे पार पडली. या निवडणुकीची मतमोजणी 2 फेब्रुवारी,2023 रोजी सकाळी 8 वाजता जिल्हा निवडणूक शाखेने स्वमालकीचे उभारलेल्या ई व्ही एम गोदाम, सय्यद प्रिंप्री येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सय्यद प्रिंप्री येथील मतमोजणी केंद्राची पाहणी केली असून मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे, असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (प्रशासन) रमेश काळे यांनी सांगितले. यावेळी उपायुक्त उन्मेष महाजन, तहसीलदार साहेबराव सोनवणे, सहायक संचालक (लेखा) विजय सोनवणे, तहसीलदार राजेंद्र नजन, नायब तहसीलदार राजेश अहिरे व इतर अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
यावर्षी प्रथमच जिल्हा निवडणूक शाखेच्या सय्यद प्रिंप्री येथील नुतन गोदामात मतमोजणी होणार आहे. या गोदामात दोन मोठे हॉल, इव्हीएम स्ट्रॉंग रूम, निवडणूक निरीक्षक केबिनसह कर्मचाऱ्यांसाठी प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतमोजणी केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणीचे ठिकाणी मीडिया सेंटर उभारण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने मतमोजणीच्या ठिकाणी आवश्यक असेल तेथे बॅरेकेटींगची व्यवस्था केली आहे. मतमोजणी केंद्रावर आवश्यक आरोग्य सुविधा, सर्व अधिकारी- कर्मचारी यांची भोजन, बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. अखंडित वीज पुरवठ्याच्या नियोजन करण्यात आले आहे.
Nashik Graduate Election Counting Preparation