नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी दि. 2 फेब्रुवारी रोजी सय्यद पिंप्री येथील गोदामात होणार आहे. मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर अधिकारी व कर्मचारी यांचे मत मोजणी प्रशिक्षणपूर्ण झाले आहे.
मतमोजणी प्रकिया
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण 1 लाख 29 हजार 456 मतदारांनी मतदान केले. याची मतमोजणी सय्यद पिंप्री येथील गोदामात 28 टेबलवर होणार आहे. एका टेबलावर एक तहसीलदार आणि दोन नायब तहसीलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व मतपेट्यामधील मतपत्रिका एकत्रित करून त्यांचे एक हजाराचे गठ्ठे करण्यात येतील.यानंतर बाद मतपत्रिका बाजूला काढून वैध मतपत्रिकेवरून कोटा ठरविण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.
अशी करण्यात आली आहे तयारी
मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणी कक्ष, निरीक्षक कक्ष, सुरक्षा कक्ष, माध्यम कक्ष, केंद्रावरील टेबल रचना, प्रकाश व्यवस्था, विद्युत पुरवठा, आरओ, एआरओ बैठक व्यवस्था, उमेदवारांसाठी बैठक व्यवस्था तसेच आवश्यक त्या कक्षांची उभारणी करण्यात आली आहे. मतमोजणी कक्षात मोबाईल घेऊन जाता येणार नाही. मतमोजणीसाठी नेमलेल्या अधिकारी-कर्मचारी यांनी आपले ओळखपत्र सोबत ठेवत जबाबदारी देण्यात आलेल्या ठिकाणीच थांबावे तसेच उमेदवारांनी नेमलेल्या मतमोजणी प्रतिनिधी यांनी देखील नियुक्ती दिलेल्या ठिकाणीच थाबावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Nashik Graduate Election Counting 28 Tables