नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला असून त्याला महाविकास आघाडीनेही पूर्ण पाठिंबा दिला आहे. मात्र भाजपने अद्याप आपला उमेदवार घोषित न केल्यामुळे गुढ कायम आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार आणि पक्षश्रेष्ठींच्या यादीत असलेले उमेदवार वेगळे आहेत का, असा प्रश्न भाजपच्या बाबतीत विचारला जात आहे.
पदवीधर मतदारसंघात नाशिक, नगर, जळगाव, धुळे व नंदुरबार यांचा समावेश होतो. त्यामुळे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. याशिवाय धनराज विसपुते आणि हेमंत धात्रक हे दोघे देखील भाजपकडून निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत. काँग्रसने अर्थात महाविकास आघाडीने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी डॉ. सुधीर तांबे यांना पुन्हा एकदा उमेदवार घोषित करून आपला पत्ता टाकला आहे. पण भाजपने अद्याप आपले पत्ते उघडलेले नसल्याने राजकीय वर्तुळात अस्वस्थता आहे.
डॉ. तांबे गड राखणार?
डॉ. सुधीर तांबे यांनी पोटनिवडणुकीच्या माध्यमातून या मतदारसंघात एन्ट्री घेतली होती. त्यानंतर २००९ पासून सलग तीनवेळा ते निवडून आले. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असतानाही त्यांना नाशिकच्या पदवीधर मतदारसंघात काहीही दिवे लावता आले नव्हते. त्यामुळे आता पुन्हा एकदा गड राखण्यात डॉ. सुधीर तांबे यांना यश येणार, असा विश्वास व्यक्त होत आहे.
बड्या नेत्यांचे कनेक्शन
डॉ. राजेंद्र विखे हे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू आहेत. तर दुसरीकडे डॉ. सुधीर तांबे हे महाराष्ट्राचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे आहेत. त्यामुळे तांबे यांना टक्कर देण्यासाठी डॉ. विखे हाच उत्तम पर्याय समजला जात आहे. शिवाय दोन बड्या नेत्यांच्या कनेक्शनमुळेही निवडणूक जोरदार होण्याची शक्यता आहे.
Nashik Graduate Constituency Election Candidate Politics