नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णांवर उपचारासाठीचा केसपेपर काढताना आपल्या जातीचा उल्लेख करावा लागत आहे. यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जोरदार आक्षेप घेतला असून यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना पत्र पाठवत हा जातीचा रकाना त्वरित वगळावा अशी मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात गोरगरिबांवर-वंचितांवर माफक दरात उपचार होत असतात, मात्र जर हे उपचार हवे असतील तर आपल्याला या रुग्णालयातील काही बाबी पूर्ण कराव्या लागतात, त्यात सर्वप्रथम म्हणजे रुग्णाच्या नावाने केस पेपर फाडणे, आणि याच केस पेपरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या केस पेपरमध्ये एका रकान्यात जात विचारण्यात आली आहे.
यावर आता नाशिक अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जोरदार आक्षेप घेतला असून या संदर्भात राज्याच्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना पत्र पाठवणार असल्याचे समितीने म्हटले आहे. हा प्रकार फक्त नाशिकमध्ये नसून तर राज्यभर सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जातीचा हा रकाना त्वरित वगळावा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून होत आहे.
अजित पवारांनीही घेतली दखल
राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्यांची जात विचारण्याचा प्रकार जातीभेदाला खतपाणी घालणारा, घटनाविरोधी, मानवताविरोधी, राज्य शासनाची असंवेदनशीलता, आजारी मानसिकता दाखवणारा आहे. शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही रुग्णाला त्याची जात विचारली जाऊ नये. मनमाड उपजिल्हा रुग्णालयासह राज्यात अन्यत्र कुठेही असे प्रकार सुरु असतील तर ते तत्काळ थांबवावेत, ताबडतोब निर्देश द्यावेत अशी मागणी करतो.
पुण्याही घडला प्रकार
अजित पवार यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयातही रुग्णांना जात विचारण्याचा प्रकार यापूर्वी घडला होता. शेतकऱ्यांना खतखरेदी करण्यासाठीही जात सांगणं अलिकडे बंधनकारक केलं होतं. त्यावेळीही भविष्यात असे प्रकार थांबवण्याचा आम्ही सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर सुद्धा हा प्रकार घडला आहे.
नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्यांची जात विचारण्याचा प्रकार जातीभेदाला खतपाणी घालणारा, घटनाविरोधी, मानवताविरोधी, राज्य शासनाची असंवेदनशीलता, आजारी मानसिकता दाखवणारा आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 5, 2023
Nashik Government Hospital Case Paper Caste Compulsion