नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरे वसतीगृह मैदान येथे ६ ते १० डिसेंबरदरम्यान कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात शेतकर्यांसाठी परिसंवाद, आधुनिक शेती औजारे प्रदर्शन, शेतकरी सन्मान सोहळा, खाद्य महोत्सव अशी पर्वणीच शेतकयांना मिळणार आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन होणार असून पालकमंत्री दादा भुसे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या महोत्सवात दोनशे पेक्षा जास्त स्टॉल्स असणार आहे. विविध विभागांच्या शासकीय योजनांची माहीती शेतकर्यांपर्यंत पोहचवण्यासाठी शासकीय दालने, शेतातील शेतकर्यांचा शेतमाल थेट शहरी ग्राहकांच्या घरात पोहचावा यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री, सेंद्रीय शेतमाल विक्री तसेच शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गट यांच्यामार्फत उत्पादीत केलेले प्रक्रियायुक्त पदार्थ विक्रीसाठी गटांना स्टॉलस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत . शेतकर्यांसाठी विविध शेती पध्दती, फळे व भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान व प्रक्रिया उद्योग, महीला परिसंवाद तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने विविध विषयांवर परिसंवादाचे आयोजन केले आहे. प्रगतीशील शेतकर्यांना यावेळी विशेष पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. कृषी महोत्सवात प्रवेश विनामुल्य असल्याने शेतकरी, नागरिकांनी या महोत्सवात सहभाग नोंदवावा असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
खाद्य महोत्सव ठरणार आकर्षण
ग्रामीण महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे विविध खाद्य पदार्थ विक्रीचे स्टॉल्स या प्रदर्शनात असणार आहे. यामध्ये शेगाव कचोरी, नागलीची भाकरी, चटणी, मांडे, मटन भाकरी, भरीत भाकरी, थालीपीठ, खेकडा भाजी व भाकरी, खान्देशी जेवण, मशरूमच्या पाककृती, कढी, खिचडी, दालबाटी, कुळीदाचे मुटकुळे व शेंगुळे आदी खाद्यपदार्थांची चव नागरिकांना चाखता येणार आहे.
कृषी प्रदर्शनाची वैशिष्टे
– शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री
– खरेदीदार विक्रेता संमेलन
– परिसंवाद व चर्चासत्रे
– सेंद्रीय शेतमाल विक्री
– आधुनिक शेती अवजारांचे प्रदर्शन
– खाद्य महोत्सव
– धान्य महोत्सव
– दोनशेहून अधिक कंपन्यांचा सहभाग
– परदेशी भाजीपाला प्रदर्शन
Nashik Government Agri Expo Farmers Product