नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा परिषदेने पानवेलींपासून विविध घरगुती उपयोगाच्या वस्तू बनविण्याची कार्यशाळा आयोजित करुन महिलांना प्रशिक्षण दिले असून सदरचा उपक्रम स्तुत्य आहे. तसेच प्रशिक्षित महिलांनी गोदावरी नदीतील पाणवेलीपासून बहुपयोगी उत्कृष्ट अशा वस्तु तयार केल्या आहेत. या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना फॅब इंडिया, अमेझॉन इत्यादी सारखे व्यवसायिक ब्रॅण्ड उपलब्ध करुन द्यावे, असे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.
गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी विभागीय आयुक्त श्री.गमे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, निरीचे वरीष्ट शास्त्रज्ञ डॉ.नितीन गोयल, उपायुक्त (करमणूक शुल्क) डॉ.राणी ताटे, उपायुक्त मनपा विजयकुमार मुंडे, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गळे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, उपसंचालक (माहिती) ज्ञानेश्वर इगवे, गोदावरी समितीचे तज्ज्ञ सल्लागार डॉ.प्राजक्ता बस्ते, याचिकाकर्ते निशीकांत पगारे, राजेश पंडीत आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, जिल्हा परिषदेप्रमाणे महानगरपालिकेने देखील त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या बचतगटांना पानवेलींपासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षणाबरोबरच प्रशिक्षणात कार्यालयील कामकाजात आवश्यक असणाऱ्या स्टेशनरी बनविण्याचे देखील प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच ‘GEM’ पोर्टलवर देखील या बचतगटांचे रजिस्ट्रेशन करावे, जेणेकरुन त्यांना विक्रीसाठी व्यासपीठ मिळेल, असेही श्री गमे यांनी यावेळी सांगितले.
गणेशोत्सवातील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षणासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन करुन यावेळी समितीसमोर आलेल्या तक्रारींचे निरसन केले. यावेळी सगुणा रुरल फाँडेशन, नेरुळ यांनी पानवेली नष्ट करण्याबाबतचे पी.पी.टीद्वारे सादरीकरण केले. तसेच यावेळी पानवेली पासून बहुउपयोगी वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या चांदोरी येथील महिलांचा सत्कार करण्यात आला, गोदावरी गीत लिहीणाऱ्या प्रा.सुरेखा बोऱ्हाडे, पर्यावरणपुरक मोहरम साजरा करणाऱ्या बोहरी कम्युनिटीचा सत्कार यावेळी श्री गमे यांच्या हस्ते करण्यात आला.
Nashik Godavari River Panveli Items Making