नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, अर्थातच गुढीपाडवा, भारतीय संस्कृतीत ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा दिवस ‘महापर्व’ म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण ‘गुढीपाडवा’ म्हणून साजरा करतो. या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते.ही गुढी स्नेहाचे, मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतिक मानली जाते. ती विजयाचा संदेशही देत असते. नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे यंदा गुढी पाडव्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत येत्या मंगळवारी (२९ मार्च) सायंकाळी ६ वाजता गोदाघाटावर १ हजार ढोलचे महावादन होणार आहे.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले; तो हा विजयोत्सवाचा दिवस. घरातून वालीचा, आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे. याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवासही संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला, त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र-शुद्ध प्रतिपदेचाच.
गुढीपाडवा व हिंदू नववर्षाचे स्वागत पारंपरिक पद्धतीनेच करण्यासाठी दरवर्षी या नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात येते.
राष्ट्रीय विकास मंडळ संचलित, नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक यांच्या तर्फे या हिंदू नववर्षाचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात आणि शोभा यात्रांच्या जल्लोषात साजरा करण्याची पद्धत गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे. मात्र कोरोनामुळे मागील सलग दोन वर्ष या शृंखलेमध्ये खंड पडला होता. मात्र यंदा हे कोरोनाचं सावट काहीसं कमी झाल्याने, मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे असलेली मरगळ दूर करून यंदा मोठ्या जल्लोषात आणि मोठ्या उत्साहात भव्य अशी नववर्ष स्वागत यात्रा होणार आहे.
वर्ष २०१६ पासून दरवर्षी गोदातीरी गुढीपाडव्याच्या एक आठवडे आधीपासुन संस्कृती जपणारे विविध सामूहिक कार्यक्रम घेण्यात येतात. कार्यक्रमाचे उद्देश्य हे आपल्या भारतीय संस्कृती चे संवर्धन, जतन आणि दर्शन हा असतो. कार्यक्रमाचे विषय हे नेहमीच राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता, पर्यावरण रक्षण, शिक्षण सेवा, महिला सबलीकरण, गोसेवा, सामाजिक एकता, इत्यादी प्रमाणे असतात. या वर्षी “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव” हे सर्व कार्यक्रमाचा विषय असेल.
गुढीपाडवा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने नववर्ष स्वागत यात्रा समिती तर्फे शोभायात्रा व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांची पूर्वतयारी आत्तापासूनच सुरू झाली आहे. यंदाही अधिकाधिक भव्य यात्रा काढण्यासाठी आयोजक सरसावले असून बैठका सुरू झाल्या आहेत. तरी हा सण अधिक चांगल्या पद्धतीने आणि उत्साहाने साजरा करण्यासाठी नाशिककरांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे.