नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री श्री गिरीश महाजन हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा करून सायंकाळी उशिराने नाशिक शहरात दाखल झाले आहे. गंगापूर धरणातून करण्यात येणारा पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरी नदीला पूर आला असून नदी काठावरील अनेक व्यवसायिकांना याचा फटका बसला आहे. पंचवटी परिसरातील सराफ बाजार, भांडी बाजार याठिकाणी नदीचे पाणी शिरले असून दुकानदारांचे नुकसान झाले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी पंचवटी भागातील परिस्थिती जाणून घेतली. यावेळी महानगरपालिका आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांनी महापालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती मंत्री गिरीश महाजन यांना दिली. पंचवटीतीलच होळकर पूल परिसरात देखील मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन गोदावरी नदी पाणी पातळीचे पाहणी केली.
महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या २४ तासांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे, तर शहरी भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
धरणे शंभर टक्के भरली; विसर्गामुळे गावांना इशारा
राज्यातील बहुतांश धरणांमध्ये जलसाठा धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचल्याने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी, कृष्णा, पंढरा, गिरणा, भिमा, यांसह अनेक नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. नदीकाठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे सूचना मंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनास दिलेल्या आहेत. काही भागात पाण्याच्या विसर्गामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यातील मोठे प्रकल्प जायकवाडी ,हातनूर, गोसीखुर्द, कोयना, उजनी, गंगापूर ,गिरणा, पूर्ण क्षमतेने भरले आहेत या धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
या परिस्थितीची गंभीर दखल घेत मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. “ज्या ठिकाणी नागरिक अडकले आहेत, तेथे प्राधान्याने बचाव कार्य हाती घ्यावे. कोणत्याही भागात मदतीस विलंब होऊ नये,” असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवावी, अशीही सूचना त्यांनी केली. उपरोक्त परिस्थितीबाबत माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेली असून मुख्यमंत्री परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.
मंत्री गिरीश महाजन सातत्याने राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. एनडीआरएफ आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन पथके मोठ्या प्रमाणावर कार्यरत असून पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे.
मंत्रालयातून २४ तास लक्ष; हेल्पलाइन नंबर कार्यरत
मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत असून २४ तास परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करण्यात आले आहेत. नागरिकांना या क्रमांकांचा उपयोग करून वेळेवर माहिती मिळवता यावी, यासाठी प्रशासन सज्ज आहे.
नागरिकांना आवाहन
पूरस्थिती लक्षात घेता नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी अनावश्यक धोका पत्करू नये, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, तसेच कोणत्याही धरण परिसरात किंवा धबधबे परिसरात पर्यटनासाठी जाऊ नये, पाण्यात जाण्याचे साहस करू नये, खूपच आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.