नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटल्यावर काहीतरी गोंधळ झालाच पाहिजे. नाशिकमध्ये गौतमीच्या सलग दुसऱ्या कार्यक्रमात राडा झालेला आहे. यापूर्वी निफाडमध्ये गोंधळ झाला होता आणि आता ठक्कर डोम येथील कार्यक्रमात पोलिसांना लाठीमार करावा लागला. या कार्यक्रमात फोटोग्राफर आणि वृत्तवाहिनीचे कॅमेरामन यांना मारहाण करण्यात आली आहे.
अख्ख्या महाराष्ट्राला आपल्या दिलखेचक अदांनी वेड लावणारी गौतमी पाटील हिच्या लावणीचा कार्यक्रम जिथे कुठे असेल तिथे पोलिसांना कडक बंदोबस्त ठेवावा लागतो. आजपर्यंत शांततेत पार पडलेला तिचा एखादाच कार्यक्रम अपवादाने सापडेल. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तिच्या लावणीचे कार्यक्रम सातत्याने आयोजित केले जातात. नाशिकमध्ये ठक्कर डोममध्ये मंगळवारी तिच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात डान्स सुरू असताना काही दारुड्यांनी गोंधळ घातला आणि त्यातच त्यांनी माध्यमांच्या छायाचित्रकारांवर हल्ला केला. त्यांना मारहाण केली. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत काही लोक जखमीही झाले. दोन्ही छायाचित्रकारांना धक्काबुक्की करून खाली पाडण्यात आले. हा कार्यक्रम मुळात दोन तास उशिराने सुरू झाला होता. आणि त्याला पाहिजे तशी अपेक्षित गर्दीही नव्हती.
कार्यक्रम सुरू झाल्यावर काही वेळाने गोंधळ सुरू झाला. काही दारुडे अकारण गोंधळ घालू लागले. यावेळी छायाचित्रकार अशोक गवळी आणि व्हिडिओग्राफर आकाश येवले हा संपूर्ण राडा कॅमेरात टिपत होते. ते बघून दारुडे संतापले आणि त्यांनी दोघांनाही मारहाण केली. यात ते जखमी झाले.
डान्स थांबला नाही
कार्यक्रमादरम्यान छायाचित्रकारांना मारहाण झाल्यामुळे अधिकच गोंधळ झाला. आधीच दारुड्यांनी राडा घातला होता आणि आता पुन्हा मारहाण आणि धक्काबुक्की केली होती. पण या संपूर्ण प्रकाराचा कार्यक्रमावर काहीही एक परिणाम झाला नाही. गौतमी पाटीलचा डान्स सुरूच होता.
पाच जण ताब्यात
याप्रकरणी नाशिक पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले आहे. याच पाच जणांनी पत्रकारांवर हल्ला केला. तसेच, या प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. कार्यक्रमाच्या आयोजकांवरही कारवाई होण्याची चिन्हे आहेत.
नाशकात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी आणि कार्यक्रमाला प्रेक्षकांनी दाखवली पाठ
अनेक खुर्च्या रिकाम्याच pic.twitter.com/2Ue6CZWeSF— India Darpan Live (@IndiaDarpanLive) May 17, 2023
Nashik Gautami Patil Program Journalist Beaten