नाशिक – पंचवटी भागातील कुमावत नगर येथे गॅस गळतीमुळे झालेल्या सिलेंडर स्फोटात सहा जण भाजले होते त्यापैकी विरेंद्र कुमार (वय २८) या तरूणाचा आज (२६ नोव्हेंबर) मृत्यू झाला. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. यापूर्वीच लवलेश धरमराज पाल (३०) आणि संजय राम आसरे मौर्या यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्फोटातील बळींची संख्या आता ३ झाली आहे. तर, अरविंद मगदूम पाल (३०) विजय पाल (३०) व अखलेश धरमराज पाल (३५) आदींना आजच खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पेठरोड कुमावतनगर येथे शुक्रवारी (२२ नोव्हेंबर) सकाळी ७ वाजेच्या सुमारास सिलेंडरचा स्फोटात झाला. त्यात एकाच घरातील सहा व्यक्ती गंभीर जखमी झाले होते. या सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हे सर्व परराज्यातील असून मोलमजुरी निमित्त गेल्या १० ते १५ वर्षांपासून नाशिकमध्ये स्थायिक झाले आहेत. गॅस गळती झाल्यामुळे हा प्रकार घडला. माचिसने विडी पेटवतांना गॅसचा भडका झाला. त्यामुळे घरातील लवलेश धरम पाल (रा.अलादात पूर, जिल्हा उत्तर प्रदेश), अखिलेश धरंपाल (रा. सदर), विजयपाल फत्तेपूर (उत्तर प्रदेश), संजय मौर्य (रा. अलादात पूर फतेहपुर, उत्तर प्रदेश), अरविंद पाल (रा. इसापूर फतेहपुर, उत्तर प्रदेश), वीरेंद्र कुमार (रा. बारमपूर, फतेहपुर, उत्तर प्रदेश), हे जखमी झाले होते.