नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्रीराम आणि श्री गरुड रथयात्रा हा नाशिकचा लोकोत्सव आहे. तसेच रामराया आणि नाशिककर यांचे देखील अतूट नाते आहे.अयोध्येचा हा सुकुमार राजकुमार वनवासात गोदातीरी राहायला आला.खरतर रामाच्या येण्यानेच दंडकारण्य आणि त्रिकंटक असणारी ही भूमी ‘जनस्थान’ झाली आणि रामांमुळेच हिला नाशिक हे नाव मिळाले आपल्या प्रिय नाशिककरांना भेटायला साक्षात रामराया वर्षातून एकदा मंदिराबाहेर येतात,रथारूढ होऊन नगरप्रदक्षिणा करतात .आणि म्हणून रामनवमी झाली की नाशिकला रथयात्रेचे वेध लागतात.यावेळी अवघे नाशिक दर्शनासाठी गोदाकाठी लोटले असते. स्वयंस्फूर्तीने रथयात्रेत सेवा करतात. नाशिकच्या रस्त्यांवरून रामरथ फिरतो तसतसा नाशिककरांच्या धमन्यांमधून रामनाम फिरत असते. गोदावरीच्या अविरत प्रवाहासारखी गोदाकाठची ही परंपरा वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या चालते आहे. आपल्या काठावरच हे कौतुक गोदामाई प्रतिबिंब म्हणून साठवून ठेवते आहे.
जन्मोत्सवानंतर कामिका एकादशीला रथयात्रा काढण्याची परंपरा पेशवेकाळापासून चालत आली आहे. हा रथोत्सव श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा ते पुन्हा राम मंदिर ते पुन्हा राम मंदिर पूर्व दरवाजा असा असतो. श्री गरुड रथयात्रा निघण्याआधी गरुड रथ ओढणाऱ्या सर्व धुरंधर आणि सेवेकर्यांनी तसेच मंदिराचे पुजारी यांना पश्चिम दरवाजा येथील रविंद्र दीक्षित यांचे निवासस्थानी दुपारी गंध आणि रसपान या करीत आमंत्रित करण्यात येते. त्यानंतर काळारामांच्या भोगमूर्ती आणि पादुका मंदिरातून बाहेर आणून पालखीतून मंदिराची प्रदक्षिणा करतात. मंदिराच्या पूर्व महाद्वारा समोर उत्तुंग दोन लाकडी रथ केळीचे खांब, दिव्याच्या माळा, फुलांनी सजवून सज्ज असतात.भोगमूर्ती रामरथात तर पादुका गरुडरथात विराजमान होतात.
आरती होऊन वाद्यांचा गजर होतो आणि रामराया नगर प्रदक्षिणेला निघतात.रास्ते आखाड्याकडून रामरथ आणि श्री अहिल्याराम व्यायामशाळेकडून गरुडरथ नाड्यांनी म्हणजे मजबूत दोरखंडाने ओढले जातात. भक्तांना रामांच्या आगमनाची वार्ता द्यायला गरुडरथ रामरथाच्या पुढे चालतो. रामाकडे तोंड करून रथापुढे उलटे चालणारे सालकरी बुवा प्रतिक्षण श्रीरामप्रभूंचे रूप डोळ्यात साठवत असतात.
मंदिराच्या पूर्व दरवाजापासून निघालेली रथयात्रा नागचौक गणेशवाडी इथून जात गणेशवाडी सती आसरा देवी मंदिर मार्गे म्हसोबा पटांगणावर येते. रामराया नदी न ओलांडता इथेच विश्राम करतात.पण गोदेच्या पलीकडे राहणाऱ्या भक्तांना रामकृपाप्रसाद वाटायला गरुडरथ मात्र नदी ओलांडून जातो. मग रोकडोबा तालीम संघाचे पहिलवान रथ ओढून रोकडोबा मारुती मंदिराजवळ आणतात, तेथे रोकडोबा तालमीच्या वस्तादांमार्फत श्री मारुतीरायाची आरती संपन्न होऊन रथ पुन्हा गाडगे महाराज पुलाकडे प्रस्थान करतो. नेहरूचौक ,दहिपुल,चांदवडकर लेन,मेनरोड,बोहोरपट्टी ,सराफ बाजार या मार्गे गरुडरथ भांडीबाजारात येतो. मग बालाजीकोटात आरती स्वीकारून गरुडरथ कपूरथळा मार्गे नदी ओलांडून पुन्हा रामरथाजवळ येतो. अवघ्या नाशिककरांचे क्षेमकुशल जाणून रामचंद्र आनंदित होतात आणि रामकुंडाकडे प्रस्थान करतात.
यावेळी अहिल्याराम तालीम जवळ रथ थांबून तेथील मारुती रायाची आरती होते. यावेळी रथाच्या दोराचा स्पर्श श्री मारुतीरायाच्या पायांना केला जातो. मग त्यानंतर अहिल्याराम व्यायामशाळेच्या वस्तादांचा सत्कार देखील यावेळी केला जातो. त्यानंतर श्री गरुड रथाचे रामकुंडावर आगमन होते, तिथे वेदमंत्रांच्या घोषात गोदेच्या अमृतजलाने श्रीरामांना “अवभृत स्नान” घातले जाते. पादुकांना रामकुंडाच्या काठावरून फिरवले जाते.षोडशोपचार पूजन आणि आरती होऊन सुमारे दोन तासांच्या पूजेनंतर दोन्ही रथांचा परतीचा प्रवास सुरू होतो. नगरप्रदक्षिणा करून रामराय मंदिराच्या पूर्वद्वारी येतात.औक्षण स्वीकारून पालखीने मंदिरात जातात.भक्तांसाठी बाहेर आलेले देव गर्भगृहात पुन्हा विराजमान होतात.आरती होते आणि या भक्ती सोहळ्याची सांगता होते.
रथोत्सवाआधी एक महिन्यापासून गरुड रथाचे पूर्ण नियोजन हे अहिल्याराम व्यायामशाळेमार्फत केले जाते. या गरुड रथयात्रेचे राम मंदिर पश्चिम दरवाजा येथील दीक्षित परिवाराचे व्यवस्थापन व नियोजनाच्या दृष्टिकोनातून मोठी परंपरा आहे. अहिल्याराम तालमीचे वस्ताद म्हणून श्री क्षेमकल्याणी यांचा देखील यात सहभाग असतो. रथाला नियंत्रक म्हणून दीक्षित, गर्गे व पंचाक्षरी परिवार हे काम बघतात, तर गरुड रथाचे धुरंधर म्हणून चंद्रात्रे, कावळे, बेळे, गायधनी, पाराशरे, शौचे हे नाशिकची मूळ ग्रामस्थ घराणी परंपरागत जबाबदारी सांभाळतात.
जेव्हापासून रथ यात्रा नाशिक मध्ये सुरु झाली अगदी तेव्हापासून वंश परंपरागत मिळालेल्या या सगळ्या जबाबदाऱ्या पुढील पिढ्या देखील अभिमानाने सांभाळत आहेत. तर रथाचे पुजाधिकारी म्हणून पुजारी परिवार हे रथाच्या पूजेची सर्व जबाबदारी घेतात आणि पंचवटी येथील अहिल्याराम आखाड्याचे सर्व व्यायामप्रेमी यासाठी तयारी करत असतात. गरुड रथाचे संपूर्ण काम मग ते व्यवस्थापन असेल, नियोजन असेल, रथ ओढणे, रथ यात्रा जबाबदारीने पूर्ण करून रथ संस्थानाच्या ताब्यात पुन्हा देणे या माध्यमातून श्री काळाराम संस्थांनच्या श्रीगरुड रथयात्रेची जुनी परंपरा जपली जात आहे.
Nashik Garud Ramrath Tradition Celebration History