नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूररोड कॉलेज रोड परिसर उच्चभू वस्तीचा असून येथे अत्यंत रहदारी होत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते याकरिता पुणे शहराच्या धर्तीवर अभ्यास करून तातडीने ठोस उपाययोजना करावी असे निवेदन शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली किशोर शिरसाठ यांनी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांना दिले.
कॉलेजरोड व गंगापूर रोड परिसरात मोठ्या प्रमाणात शाळा, महाविद्यालये, विविध क्लासेस, बँका, हॉटेल, मंगल कार्यालय, रुग्णालये व व्यावसायिक आस्थापने असल्याने या भागात अगदी सकाळपासून ते रात्री पर्यंत मोठ्या प्रमाणात रहदारी असते. कॉलेजरोड व त्याला संलग्न असणाऱ्या गंगापूर रोड यांना जोडणाऱ्या पाच रस्त्यांच्या चौफुलींवर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होतांना दिसते. चार सिग्नल असून देखील वाहतूक कोंडी आटोक्यात येताना दिसत नाही, किंबहुना वाहतुक कोंडीत दिवसेंदिवस वाढच होत आहे.
वाहतूक आटोक्यात येण्याकरिता सदर दोन्ही रस्त्यांवर तातडीची उपाय योजना म्हणून पुण्याच्या धर्तीवर जी.एम.रोड व लक्ष्मी रोड व इतर रस्त्याप्रमाणे नाशिक शहरातील जुना गंगापूर नाका ते जेहान सर्कल व कॅनडा कॉर्नर ते भोसला गेट हे दोन्ही रस्ते एकेरी (वन वे) करण्यात यावे. या दोन्ही प्रमुख रस्त्यांना जोडणारे लिंक रोड म्हणजे विद्या विकास चौक ते बिग बाजार चौक, तसेच केबीटी चौक ते बीवायके कॉलेज सिग्नल, प्रसाद सर्कल ते कृषीनगर चौक, शहिद चौक ते मॉडेल कॉलनी चौक, जेहान सर्कल ते भोसला चौक सदर वरील लिंक रोड असल्यामुळे हे दोन्ही प्रमुख रस्ते गंगापूर रोड व कॉलेज रोड एकेरी (वन वे) वाहतूक करण्यास सोयीस्कर होईल.
वरील दोन्ही रस्ते पुण्याच्या धर्तीवर जी. एम. रोड व लक्ष्मी रोड येथे ज्याप्रमाणे एकेरी वाहतूक केली आहे त्याप्रमाणे या भागातील रस्त्यांवर एकेरी वाहतुक करावी जेणे करून वाहतुक कोंडी सुटण्यास मदत होईल.
तसेच शहरातील इंदिरानगर, पाथर्डी गाव वडाळा गाव मार्गे टाकळी मार्गे छ.संभाजी नगर रोड कडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनाची रहदारी असते. सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून येथे शाळा, महाविद्यालये, रुग्णालय असल्याने रहदारी असते. या मार्गावर मोठ्या संख्येने अपघात होऊन अनेक नागरिकांचे बळी गेले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी पक्षाने वेळोवेळी आंदोलने व निवेदने दिली आहेत. याबाबत अद्याप प्रशासनाने दखल घेतलेली नसल्याची सविस्तर चर्चा यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या सोबत केली. यावेळी शहर सरचिटणीस संजय खैरनार, अनिल भिडे, दीपक नरावडे, नंदू नांदवणे यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.