नाशिक – गंगापूररोडवरील अतिशय प्रसिद्ध मॉडर्न कॅफे या हॉटेलचे अतिक्रमण आज जमीनदोस्त करण्यात आले आहे. महापालिकेच्या पश्चिम विभागाच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
महापालिका आयुक्त कैलास जाधव व अतिरीक्त आयुक्त (सेवा) डॉ. प्रविण आष्टीकर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि उपायुक्त करुणा डहाळे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. सदर कारवाईच्या वेळेस पश्चिम विभागीय अधिकारी मदन हरीश्चंद्र, अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त नितीन नेर, विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील, नगर नियोजन विभागाचे अभियंते रवि बागुल व प्रदिप भामरे यांच्यासह अतिक्रमण विभागाची ३ पथके व दैनंदिन अतिक्रमण निर्मूलन पोलिस बंदोबस्त उपस्थित होता. या सर्वांच्या उपस्थितीत हे मॉडर्न कॅफेचे अनधिकृत बांधकाम काढण्यात आले. सर्व्हे नं. 687-क मधील हॉटेल मॉडर्न कॅफे यांचे अंदाजे 40 फुट बाय 40 फुट मोजमापाचे अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले.
शहरातील बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्या तसेच पार्कींंगच्या जागांवर असलेली बेकायदेशीर व अतिक्रमित असलेली बांधकामे काढून घेण्याबाबत महापालिकेने वेळोवेळी जाहिर आवाहन केले आहे. ज्या-ज्या नागरीकांनी, व्यावसायिकांनी, विक्रेत्यांनी त्यांचे अतिक्रमणे/अनधिकृत बांधकामे काढुन घेतलेली नाही, त्यांचेविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल. तेव्हा ज्यांनी-ज्यांनी असे बेकायदा बांधकामे व अतिक्रमणे केलेली आहेत. त्यांनी ती सत्वर काढून घेऊन मनपास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच सहाही विभागांमध्ये ना-फेरीवाला क्षेत्र, सार्वजनिक रस्ते, फुटपाथ, चौक इ. ठिकाणी अतिक्रमणे करुन व्यवसाय करणारे भाजीविक्रेते, फळविक्रेते, हॉकर्स, टपरीधारक व इतर तत्सम व्यावसायिक यांचेविरुध्द अशाच प्रकारची कडक कारवाई करुन प्रसंगी पोलीस विभागात गुन्हे देखील दाखल करणेत येतील, याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी, असा इशारा अतिक्रमण उपायुक्तांनी दिला आहे.