नाशिक – गेल्या काही दिवसांपासून जी शंका व्यक्त केली जात होती ती अखेर खरी ठरली आहे. नाशकात ओमिक्रॉन या कोरोनाच्या अवताराने शिरकाव केला आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी त्यास दुजोरा दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, रँडम तपासणी मध्ये गेलेल्या जेनॉम सिक्वेंसिंग मध्ये नाशिक शहरातील पहिला ओमायक्रोन रुग्ण आढळून आलेला आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले की, ओमिक्रॉन बाधित रुग्णाचा अधिक तपशील देणे उचित ठरणार नाही. या रुग्णाला कुठल्याही प्रकारची लक्षणे आढळून आलेली नाहीत. शिवाय त्याची प्रकृतीही व्यवस्थित आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. परंतु या आवताराच्या प्रसाराची गती विचारात घेता कोरोनाचे सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही केली जात आहे. आता नागरिकांनीही काळजी घेणे अगत्याचे आहे. स्वतःचे लसीकरण करून घेणे हे यावरील सर्वात महत्वाचे सुरक्षाकवच आहे. त्यामुळे उरलेल्या नागरिकांनी तातडीने स्वतःचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे
दरम्यान, नाशकातही हळूहळू कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना निर्बंधाबाबत पोलिस आयुक्तांनी यापूर्वीच आदेश काढले आहेत. जर, त्याचे पालन झाले नाही तर आणखी कठोर निर्बंध लादण्यात येण्याची चिन्हे आहेत.