नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातून मुंबईला वितरित होणाऱ्या दूध भेसळ तपासणी मोहिमेत अन्न व औषध प्रशासन नाशिक व जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी १ लाख १३ हजार २५० किमतीचा ३ हजार २० लिटर साठा नाशवंत असल्याने जागेवर नष्ट केला. नाशिकचे अन्न व औषध प्रशासन, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी व अन्न चाचणी प्रयोगशाळा यांच्या संयुक्त पथकाने नाशिक जिल्ह्यातून मुंबईला वितरित होणाऱ्या दूध भेसळ तपासणीसाठी संयुक्त मोहीम राबवली. सदर मोहिमेत एकूण चार वाहनातील ६६ हजार ७६३ लिटर दुधाचा साठ्याची जागेवर तपासणी केली. त्यातील मे. प्रवरा मिल्क प्रोसेसिंग, कासारा दुमला, तालुका संगमनेर यांचे वाहन क्रमांक एच ४८ एजी ४६९२ ची भाटवाडी गाव सिन्नर घोटी हायवे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे तपासणी केल्यानंतर हा नाशवंत दुध साठा आढळून आला.
या साठ्यात भेसळकारी पदार्थांची प्राथमिक चाचणी होकारार्थी आल्याने त्यातील दुधाचा अन्न नमुना विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित सुमारे ३ हजार २० लिटर किंमत रुपये १ लाख १३ हजार २५० किमतीचा साठा नाशवंत असल्याने जन आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने जागेवर नष्ट करण्यात आला. सदर मोहिमेत एकूण चार अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आलेले असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ अन्वये पुढील कारवाई घेण्यात येईल. सदरची धडक मोहीम ही यापुढेही सुरू राहणार आहे. तरी अन्न व्यवसायिकांनी दूध व या अन्नपदार्थात भेसळ करू नये भेसळ करताना आढळून आल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल.
तरी नागरिकांना विनंती करण्यात येते की दूध भेसळ संबंधी माहिती असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८०० या क्रमांकावर संपर्क करावा. त्याचप्रमाणे सर्व दूध संकलन व दूध संकलन व शीतकरण केंद्रांनी कायद्यानुसार आवश्यक अन्नसुरक्षा परवाना घेऊनच दूध खरेदी विक्री करावी. सर्व मोठ्या दूध प्रक्रिया अन्न व्यवसायिकांनीही परवानाधारक दूध संकलन शीतकरण केंद्राकडूनच दूध खरेदी करण्याची दक्षता घ्यावी असे आवाहन नाशिक विभागाचे सह आयुक्त संजय नारगुडे यांनी केले आहे. सदरची कार्यवाही मध्ये अन्नसुरक्षा अधिकारी श्रीमती सुदे महाजन, योगेश देशमुख, अमित रासकर, गोपाल कासार, एस के पाटील, सहाय्यक आयुक्त मनीष सानप, उ. सी लोहकरे तसेच योगेश नागरे जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, वाहन चालक निवृत्ती साबळे व नमुना सहाय्यक विजय पगारे नाशिक यांच्या पथक सहभागी होते.