नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने दिवाळी मोहिमे अंतर्गत मे. सागर स्विट सातपूर नाशिक या पेढीस २३ ऑक्टोंबर रोजी तपासणी करुन त्याठिकाणी साठविण्यात आलेल्या परराज्यातून आलेल्या प्रत्येकी १५ कि.ग्रॅ. च्या डब्यातून नमुना साठा घेतला. हा गाय तुपाचा अन्न नमुना घेऊन उर्वरित १ लाख ४८ हजार २५५ रुपये किंमतीचा साठा भेसळयुक्त असल्याच्या संशयाने जप्त करुन विक्रेत्याच्या ताब्यात ठेवण्यात आला आहे.
त्यानंतर सम्राट स्विट इंदिरा नगर नाशिक या पेढीची २३ ऑक्टोंबर रोजी तपासणी केली असता पेढीचे उत्पादन कक्ष परवाना न घेता मिठाई अन्न पदार्थाची उत्पादन व विक्री करत असल्याचे आढळून आले. परिणामी सदर पेढीची तपासणी करुन तेथून गाय तुप, काजू रोल, मलाई बर्फी असे तीन अन्नपदार्थांचे संशयावरुन नमुने घेऊन उत्पादन कक्षास परवाना नसल्याने व्यवसाय बंदचे निर्देश देण्यात आले आहेत व व्यवसाय बंद करण्यात आलेला आहे.
सदरचे अन्न नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल आज रोजी प्रलंबित आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच संबंधितावर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार पुढील कारवाई घेण्यात येईल. सदरची कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अश्वीनी पाटील, जी.एम. गायकवाड, एस. जे. मंडलिक, तोरणे, यांनी एम.एम. सानप, सहायक आयुक्त (अन्न) व व्ही.पी. धवड, सहायक आयुक्त (अन्न) यांच्या उपस्थित व म.ना. चौधरी, सहआयुक्त (अन्न) यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे.