तंत्रज्ञानाची धरून कास;
कृषी यांत्रिकीकरणातून साधला विकास
– अर्चना देशमुख
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात भात शेती करण्याचे प्रमाण अधिक आहे. भात पिकाची काढणी झाल्यानंतर भाताची साळ घेवून शेजारच्या गावात किंवा घोटी येथील मिल मध्ये जावे लागते. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांचा वेळ व वाहतूकीवर खर्च व्हायचा. ही गोष्ट लक्षात घेवून इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन येथील शेतकरी एकनाथ देवराम सारुक्ते यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून कृषी यांत्रिकीकरण योजने विषयी माहिती जाणून घेतली. आणि या योजनेंतर्गत मिनी राईस मिल यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज करून सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. त्यासाठी श्री. सारुक्ते यांना शासनामार्फत एक लाख ७१ हजार रूपयांचे अनुदान मिळाले, त्यातुन त्यांनी मिनी राईस मिल यंत्र खरेदी केले आहे.
श्री. सारुक्ते हे या यंत्राच्या मदतीने स्वत:च्या शेतातील साळ काढण्यासाठी उपयोग होत आहे. त्याचबरोबर आजूबाजूच्या शेतातील व गावातील शेतकरी देखील हे यंत्र साळ काढण्यासाठी घेवून जातात. या यंत्राच्या सहाय्याने सारुक्ते यांनी गेल्या वर्षभरात साधारण ३०-४० शेतकऱ्यांचा ७० ते ८० क्विंटल भात काढून दिला आहे. त्यामुळे श्री. सारुक्ते यांनाही उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध झाले आहेत. तसेच आसपासच्या शेतकऱ्यांचा वाहतुकीच्या खर्चातही बचत होत असल्याचे श्री. सारुक्ते यांनी सांगितले.
यासोबतच श्री. सारुक्ते यांनी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत रोटाव्हेटर या यंत्राची देखील खरेदी केली असून त्यासाठी त्यांना ३५ हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. या रोटाव्हेटर यंत्रामुळे शेतातील मशागतीचे काम वेळेत पूर्ण होण्यास मदत होत आहे. तसेच कमी खर्चात व कमी वेळेत शेतीचे मशागतीचे पूर्ण होते. त्याचप्रमाणे आसपासच्या शेतकऱ्यांनी या यंत्राची मागणी केल्यास त्यांना भाड्याने हे यंत्र उपलब्ध करून देण्यात येते. त्यातुनही श्री. सारुक्ते यांना उत्पन्न मिळत आहे.
शासनाच्या या यांत्रिकीकरण योजनेंतर्गत उपलब्ध होणाऱ्या यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून जोड व्यवसाय करण्याच्या संधी उपलब्ध होत असून त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत असल्याचे समाधान श्री. सारुक्ते यांनी व्यक्त केले.
अशी आहे ‘कृषी यांत्रिकीकरण योजना (उपअभियान)’….
– अल्प भूधारक शेतकरी व उर्जेचा कमी वापर असलेल्या शेतीत यांत्रिकीकरणाचा लाभ पोहचविण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत ‘कृषी यांत्रिकीकरण योजना’ राबविण्यात येते.
– या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक ट्रॅक्टर, ट्रॉली, पावर टिलर चलित अवजारे, बैल व मनुष्यचलित यंत्र व अवजारे, प्रक्रिया संच, पिक काढणी पश्चात तंत्रज्ञान, वैशिष्ट्यपूर्ण अवजारे व स्वयंचलित यंत्रे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते.
– योजनेच्या लाभासाठी आधार कार्ड, 7/12 उतारा, 8अ दाखला, खरेदी करावयाच्या अवजाराचे दरपत्रक, केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त संस्थेचा तपासणी दाखला, जातीचा दाखला (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती), स्वयंघोषणापत्र, पूर्व संमतीपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे.
– योजनेचा लाभ घेण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्या संपर्क करावा.
(माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक)
Nashik Farmer Rice Mill Government Scheme