शेतीतील नवदुर्गा
लता हिरामण मौले
काट्यांच्या वाटेवर तिच्या जिद्दीची दरवळ
पतीच्या निधनानंतर हताश न होता २०व्या दिवशी शेतावर येऊन आयुष्यातील काट्यांना बाजूला सारीत जिद्दीने गुलाब फुलवणाऱ्या लता हिरामण मौले या नवदुर्गेची ही प्रेरक कथा.
माहेरी शेतीचा कुठलाही अनुभव नसलेल्या लता यांना कधी वाटलंही नव्हतं कि आयुष्यात एक काळ असा येईल जेव्हा हि शेतीच आपला भक्कम आधार असेल. सातपूर येथील माहेर असलेल्या लता यांच्या माहेरी वडील एसटी महामंडळात व भाऊ महानगर पालिकेत अशा प्रकारे सर्व नोकरीस असल्याने शेतीशी थेट संबंध कधी आलाच नाही. 8वी शिक्षण झाल्यानंतर 1989 साली मोहाडी येथील हिरामण मौले यांच्याशी विवाह झाला. सासरी सासूबाई आणि पती एवढेच कुटुंबीय होते. पती एचएएल कंपनीत नोकरीस होते. त्यामुळे सासूबाई आणि पती यांच्या मार्गदर्शनाखाली घरची शेती त्या स्वतः पाहू लागल्या. त्यापूर्वी शेतीत अनुभव जरी नसला तरी सर्व काम त्या आवडीने करत. पतीची नोकरी आणि शेती असे दोन उत्पन्नाचे स्रोत त्यावेळी होते तसेच घरची आणि मुलांच्या जबाबदारीत सासूबाई मदतीला होत्या.
त्यावेळी शेतात एक वर्ष बाजरी लावलेली होती. त्यानंतर थॉमसन व्हरायटीची द्राक्षबाग लावण्यात आली. द्राक्षात वारंवार येत असलेल्या अडचणींमुळे त्या पुढे वेलवर्गीय पिकांकडे वळल्या. ज्यामध्ये कारले, गिलके, भोपळे अशा पिकांची लागवड केली. त्या काळात आजूबाजूच्या भागात पॉलिहाऊस वाढत होते. त्याचा परिणाम या पिकांवर होत होता. पिकाला व्यवस्थित हवा न लागणे, व्हायरसचा प्रादुर्भाव या सारख्या अनेक अडचणी येऊ लागल्या. त्यानंतर आता वेलवर्गीय पिकांमध्ये अधिक खर्च न करता गुलाबशेती करण्याचा विचार त्यांच्या मनात डोकावला. तसा त्यांनी आग्रहच धरला.
सुरुवातीला हिरामण त्यासाठी तयार नव्हते. पण लता यांनी पतीला समजावत तसेच स्वतः सर्व जबाबदारी घेऊन 2015 मध्ये त्यांच्या एक एकर क्षेत्रात सुपर व्हरायटीच्या गुलाबांची लागवड केली. या दरम्यान त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्ये झाली. दरम्यानच्या काळात गुलाबाच्या शेतीत त्या नानाविध प्रयोग करीत होत्या. काळ पुढे सरकत होता. काही वर्षांनंतर मुलीचे लग्नही झाले आणि मुलगा इंजिनीरिंगच्या शिक्षणासाठी बाहेरगावी राहू लागला. या काळात त्यांनी पुतणे आणि इतर अनुभवी शेतकऱ्यांकडून माहिती घेत गुलाबशेतीला त्यांनी सुरुवात केली.
2016 मध्ये अचानक एक घटना घडली आणि लता यांच्या आयुष्याचे सर्व चित्र पालटले. पती हिरामण मौले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हि घटना खूप मोठा धक्का देणारी होती. आपल्यावर आता मुलांची आई आणि वडील अशा दोन्ही जबाबदाऱ्या आल्या आहेत याची जाणीव झाली. हा विचार करत त्यांनी पुन्हा उभं राहायचं ठरवलं. पतीच्या निधनानंतर 20व्या दिवशी त्या पूर्ण शेताला फेरी मारून आल्या. कदाचित या शेतीतूनच संपूर्ण परिस्थितीला तोंड देण्याचं बळ त्यांना मिळालं असावं आणि त्यांनी पुन्हा शेतीला सुरुवात केली. मुलानेदेखील पहिले 2 वर्ष शिक्षण बाजूला ठेवत आईला शेतीत हातभार लावला. शेतीतील कष्टातून उत्पन्न काढत पुढे त्यांनी स्वतःचे घर बांधले. पुढे त्यांनी मुलाला त्याचं शिक्षण पूर्ण करण्यास सांगितले.
एकट्याने सर्व शेती त्या पाहू लागल्या. मुलगा सागर याने शिक्षण पूर्ण केले. त्याला व्यवसायाची आवड होती. त्याच्या या निर्णयाला पाठिंबा देऊन लता यांनी त्याला मुंबईला पाठवले. दादर मार्केटला फुलांचा व्यापारी म्हणून त्याने तिथे काम करण्यास सुरुवात केली. मुलाने आईला त्याच्या कुटुंबासोबत मुंबईला राहायला येण्याचा आग्रह केला पण लता यांना शेती सोडणे मान्य नव्हते. त्यांची ओढ शेतीचीच होती. त्यामुळे त्यांनी गावीच शेतात राहण्याचे ठरवले. या सर्व प्रवासात शेती हीच लता यांची प्रेरणा राहिली आहे. या शेतीतच चांगलं पेरलं तर चांगलं उगवेल हा त्यांचा आजही विश्वास आहे…
Nashik Farmer Lata Maule Success Story