इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– व्हिजन नाशिक – भाग ६
इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मॅनुफॅक्चरिंग हब
मित्रांनो, गेल्या आठवड्यात आलेल्या दोन महत्वपूर्ण बातम्यांनी माझे लक्ष वेधून घेतले. पहिली बातमी, मा. धर्मादाय सहआयुक्तांनी नवनियुक्त २१ विश्वस्तांकडे ‘नाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड म्यॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ (निमा) चा कार्यभार सोपविला. नवीन विश्वस्तांनी बैठकीत सर्वानुमते धनंजय बेळे यांची निमाच्या अध्यक्षपदी निवड केली. नूतन कार्यकारिणी ने विधिवत सूत्रे स्वीकारून निमाची विस्कटलेली आर्थिक घडी सुरळीत करून, कारभारात सुसूत्रता व पुनर्वैभव मिळवून देण्याची ग्वाही दिली आहे. त्याबद्दल धनंजय बेळे व संपूर्ण टीम चे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. जवळपास दोन वर्षांपासून ठप्प झालेल्या कामकाजाचा आता नववर्षात श्रीगणेशा झाला आहे. आणि दुसरी बातमी अशी कि, १९७८ पासून कार्यरत असलेल्या ‘एबीबी इंडिया’ चा ४४ वर्षे जुना प्लांट ‘इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल’ (आयजीबीसी) कडून “ग्रीन फॅक्टरी बिल्डिंग” चे प्लॅटिनम प्रमाणपत्र मिळविणारा नाशिक मधील सुमारे दहा हजार उद्योगांपैकी पहिला प्लांट बनला आहे. पाठोपाठ आलेल्या ह्या दोन्ही बातम्यां मध्ये आपल्याला काही संयोग दिसतो का? चला बघूया…
पद्मश्री (स्व.) बाबूभाई राठी ह्यांनी नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आणि उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ५२ वर्षांपूर्वी म्हणजेच, २४ जानेवारी १९७१ रोजी ‘नाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड म्यॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ (निमा) ह्या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली होती. स्थापनेपासून ‘निमा’ चे कार्यक्षेत्र व्यापक असल्यामुळे उद्योगां संबंधित प्रश्नांसाठी प्रशासनाकडून ‘निमा’ ला नेहमी विश्वासात घेतले जाऊ लागले आणि सरकार दरबारी ‘निमा’ चे स्थान हि अधोरेखित होत गेले. नाशिकच्या औद्योगिक विकासाला आणि शहरातील नवीन गुंतवणूकीस चालना देण्यासाठी ‘निमा इंडेक्स’, ‘निमा पॉवर’, ‘मेक इन नाशिक’ सारखी औद्योगिक प्रदर्शने, बी-टू-बी मिट्स, विविध कार्यशाळांच्या माध्यमातून उद्योजगांच्या हितास नेहमीच प्राधान्य होते. परंतु आपला मूळ उद्देशाचा विसर पडल्याने, ‘निमा’ मध्ये मध्यंतरीच्या काळात राजकारण वरचढ झाल्याने, गट-तट, हेवे-दावे, आरोप-प्रत्यारोप, कोर्ट-कचेऱ्या झाल्यात आणि एकूणच नाशिकच्या विकासाला खीळ बसली.
खरेतर ‘निमा’ सारख्या प्रतिष्ठित संस्थांवर पदाधिकाऱ्यांची निवड हि “बिनविरोध” व्हायला हवी. लॉकडाउन मुळे उद्योग व्यवसाय डबघाईस आलेले असतांना आणि नंतर ऐन सुवर्ण महोत्सवी वर्षांत संस्थेला टाळे लागल्याने प्रामाणिक सभासदांसाठी व एकूणच नाशिककरांसाठी हि फारच क्लेशदायक बाब झालेली. तब्बल दीड वर्षे ‘निमा’ प्रशासकांच्या ताब्यात राहिल्याने उद्योजकांची प्रश्ने मागे पडलीत. मात्र नवीन वर्षाच्या सुरवातीलाच मा. धर्मादाय सहआयुक्तांनी इच्छुकांच्या मुलाखती घेऊन निमाच्या विश्वस्तांची निवड केली आणि २१ विश्वस्तांकडे ‘नाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड म्यॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)’ चा कार्यभार सोपविला. हि एक सकारात्मक सुरवात आहे. आता सर्व संबंधित हेवे-दावे विसरून ‘निमा’ स पुनःश्च गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी एकदिलाने काम करतील अशी आशा आहे.
आपल्या नाशिकच्या ‘इलेक्ट्रीफीकेशन आणि ऑटोमेशन’ क्षेत्रात नामवंत असलेल्या “एबीबी इंडिया” ने सीनिअर व्हाइस प्रेसिडेंट गणेश कोठावदे ह्यांच्या नेतृत्वाखाली कंपनी मध्ये सीएफसीमुक्त एअर कंडिशनर, नैसर्गिक प्रकाश आणि व्हेंटिलेशनचा पुरेपूर उपयोग, उष्णतारोधक छताचा वापर, ऑनसाइट सोलर सिस्टिम, रिन्यूएबल वीज निर्मिती, रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम, अंतर्गत सांडपाणी प्रक्रिया केंद्र, शक्य तिथे वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अशा विविध उपाय योजनांमुळे ४४ वर्षे जुन्या प्लांटला ‘इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल’ (आयजीबीसी) कडून “ग्रीन फॅक्टरी बिल्डिंग” चे प्लॅटिनम प्रमाणपत्र मिळाले आहे. सातपूर मधील ह्या प्लांटमध्ये १५ हून अधिक प्रॉडक्ट लाइन्सद्वारे उत्पादित माल संपूर्ण भारत तसेच जगातील सुमारे १२० हून अधिक देशांमध्ये निर्यात होतो. हि खरोखरच अभिमानास्पद कामगिरी आहे.
वरील दोन्ही घटनांमधून सकारात्मक इच्छाशक्तीचे दर्शन होते. ह्या अनुषंगाने आपल्या नाशिकचे “इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक” क्षेत्रांमध्ये नक्की काय स्थान आहे? ह्याचा मागोवा घेतांना असे आढळून आले कि, नाशिकच्या औद्योगिक परिसरात “इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक” उत्पादन आणि सेवा क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या हजाराहून अधिक लहान – मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. त्यातील काही नामवंत ब्रॅण्ड्स म्हणजे एबीबी इंडिया, सिमेन्स, क्रॉम्पटन, लार्सन अँड ट्रूब्रो, रिषभ इंस्ट्रुमेंट्स, मोटवाने मॅनुफॅक्चरिंग, शिवानंदा, पॉलीकॅब, लीग्रँण्ड, सीजी ल्युसी, बॉश, टीडीके, गोगटे इलेकट्रोसिस्टिम, निलय इंडस्ट्रीज, नारखेडे उद्योग, पॉप्युलर स्विचगियर, आकांक्षा पॉवर, सिग्मा इलेकट्रोसिस्टिम, मॉंक ऑटोमेशन, फॉक्स सोल्युशन्स, एक्लॉन इलेक्ट्रॉनिक्स, रत्नपारखी इलेक्ट्रॉनिक्स, स्वामी समर्थ इलेक्ट्रॉनिक्स, ज्योती स्ट्रक्चर्स इत्यादी.
नाशिक हे इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रिकल उद्योगांसाठी देशाच्या नकाशावर प्रसिद्ध आहे. नाशिकमध्ये स्विच गियर्स, सर्किट ब्रेकर्स, ट्रान्सफॉर्मर, एनर्जी मीटर्स, कंट्रोल पॅनल्सचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. विद्युत उपकरणे ही पॉवर सिस्टम नेटवर्कमध्ये निर्मिती, प्रसारण आणि वितरणापासून महत्त्वाची भूमिका बजावतात, अशा विद्युत उपकरणांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार चाचणी करणे आवश्यक असते. मात्र, ह्या उत्पादनांचे ऑडिट करून, मानांकन देणारी सरकारी तपासणी प्रयोगशाळा नाशिक मध्ये नसल्याने येथील उद्योजकांना आपली उत्पादने तपासणीसाठी बंगलोर, भोपाळ येथे पाठवावी लागतात. तेथून ती मान्य झाली की मगच ही उत्पादने बाजारात विक्रिसाठी पाठविता येतात, हे फारच काम वेळखाऊ आणि खर्चिक काम असून विकासाच्या प्रक्रियेमध्ये बाधक आहे.
साधारण १० वर्षांपूर्वी ‘निमा’ चे तत्कालीन अध्यक्ष धनंजय बेळे आणि ‘निमा पॉवर’ चे अध्यक्ष मिलिंद राजपूत ह्यांनी ‘निमा पॉवर’ प्रदर्शनातून नाशिकमध्ये “इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब” व्हावी अशी आग्रही मागणी प्रामुख्याने मांडली होती. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकारकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याने नाशिकमध्ये “इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब” मान्यता मिळाली आणि शिलापूर मध्ये त्याचे बांधकाम हि सुरु झाले. नाशिकमध्ये उभारण्यात येत असलेल्या ह्या “सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिटयूट (सीपीआरआय)” च्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे काम आता अंतीम टप्प्यात आलेले असून लवकरच ती कार्यरत होईल अशी अपेक्षा आहे. ह्या ‘’इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब” चा फायदा केवळ नाशिक नव्हे तर संपूर्ण पश्चिम भारतातील सर्वच इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रिकल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना होणार आहे.
परंतु गेल्या दहा वर्षांमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले, काही उद्योगांचे स्थलांतर झाले तर काही उद्योग बंद पडलीत, अस्थिर ‘निमा’, राजकीय व प्रशासकीय पाठपुराव्याचा अभाव, कोरोना आणि लॉकडाऊनने तर भरीसभर घातली. अशा अनेक कारणांमुळे इतर शहरे नाशिकच्या पुढे निघून गेलीत. नाशिक येऊ घातलेला “ग्रीनफिल्ड इलेक्ट्रॉनिक क्लस्टर” प्रकल्प हि रांजणगावला गेला. ह्या प्रकल्पामुळे नाशिकच्या विकासा नक्कीच गती आली असती. सर्वानी सकारात्मकतेने प्रयत्न करून नाशिकला “ग्रीनफिल्ड इलेक्ट्रॉनिक्स क्लस्टर” प्रकल्प आणण्यासाठी काम करणे अत्यंत आवश्यक आहे. लवकरच कार्यरत होणाऱ्या “इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब” मुळे इलेक्ट्रीक उत्पादनांच्या तपासण्या, संशोधन आणि प्रमाणन यांची सुविधा उपलब्ध होऊन नाशिकच्या विकासाला चालना मिळेल, शिवाय ह्या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे ह्यात शंका नाही.
पेट्रोल आणि डिझेलच्या मर्यादित पुरवठ्यामुळे आणि त्यावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी येणाऱ्या भविष्यात पर्यावणपूरक इलेक्ट्रिक, सीएनजी, हायब्रीड वाहने आणि चार्जिंग स्टेशन्स ह्यांची संख्या खूप वाढणार आहेत. शिवाय अक्षय, शाश्वत ऊर्जा प्रणाली आणि त्यावर आधारित उपकरणे यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार असून येत्या काळात ‘इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स’ क्षेत्राला खूप वाव असणार आहे. आता सर्व संबंधितांनी ‘झाले गेले विसरून जाऊन’ नाशिकच्या धोरणात्मक विकासासाठी एकत्र येऊन प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास आपले नाशिक “इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मॅनुफॅक्चरिंग हब” होऊ शकते ह्यात शंकाच नाही.
आपल्या सूचना, अभिप्राय आणि प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.
पियुष सोमाणी, विशाल जोशी (सह लेखक)
श्री पियूष सोमाणी ज्येष्ठ उद्योजक व संस्थापक, ईएसडीएस.
Email ID: visionnashik@esds.co.in
WhatsApp: 9011009700
Nashik Electrical and Electronic Hub Vision Nashik By Piyush Somani
Industry Growth Development CPRI Testing Lab