नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही महिन्यांपासून ग्राहकांचा इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीकडे कल वाढला आहे. त्यामुळेच रस्त्यावर आता मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक दुचाकी दृष्टीस पडत आहेत. त्यातच सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड आहे. कडाक्याच्या उन्हाचाही इलेक्ट्रिक दुचाकींवर परिणाम होतो की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. कारण, नाशकात आज अचानक एका दुचाकीला आग लागली. आणि पाहता पाहता ही दुचाकी क्षणार्धात पूर्णपणे जळून खाक झाली.
सारडा सर्कल भागातील एका शोरुममध्ये सर्व्हिसिंगसाठी इलेक्ट्रिक दुचाकी आणण्यात आली होती. मात्र, अचानक शॉर्टसर्किटमुळे या दुचाकीने पेट घेतला. या घटनेत ही इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक झाली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
या दुचाकीला आग लागल्याचे समजताच या दुचाकीला सर्व्हिसिंग सेंटरमधून तातडीने बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी बचावकार्य करण्यासाठी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली..
Nashik Electric Bike Fire Burn Video