नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यातही नाशिकची निवडणूक सर्वाधिक लक्षवेधी ठरली आहे. क्षणा क्षणाला स्थिती बदलते आहे. रिंगणातील प्रमुख उमेदवार सत्यजित तांबे यांची नेमकी भूमिका काय, तेही गुलदस्त्यातच आहे. संभ्रमाची स्थिती असतानाच एका कार्यकर्त्याने तांबे यांना फोन केला. त्याच्यासोबतच्या संभाषणाचे रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होते आहे. त्यात सत्यजित तांबे यांनी पक्षीय राजकारणापलिकडे काम करायचे असल्याची भूमिका मांडली आहे.
राजकीय हालचालींना वेग आला असतानाच जळगावमधील सुधीर ठाकूर या कार्यकर्त्याने सत्यजित तांबे यांना फोन करून त्यांच्या भूमिकेबाबत विचारणा केली. तांबे यांनीही आपल्या पुढील राजकारणाची दिशा यावेळी स्पष्ट केली. मला यापुढे पक्षीय राजकारणापलिकडे जाऊन काम करायचे आहे. मी ठरवले आहे आता पक्षीय राजकारणापलीकडे काम करणार आहे. सध्या मी अपक्ष उमेदवार म्हणून काम करत आहे. लवकरच माझी भूमिकाही महाराष्ट्राला कळेल, असे त्यांनी सांगितले. या संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते आहे.
वादळ शांत होऊ द्या
सध्या वादळ सुरू आहे. वादळात वादळ असे व्हायला नको. म्हणून केवळ वादळ शांत व्हायची वाट पाहतोय. सगळे शांत होऊ द्या, मग १९ ते २० तारखेला तुम्हाला सगळे कळेल, असे म्हणत सत्यजित तांबे यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधला आहे. या दोघांमधील संभाषणानुसार सत्यजित तांबे यांच्या भूमिकेसाठी मतदारांना आणि कार्यकर्त्यांना आणखी २ ते ३ दिवस वाट पाहावी लागणार आहे.
नाशिकमध्ये जोरदार हालचाली
नाशिक पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक हालचाली सुरू आहेत. शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यास शिवसेना तयार आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंबा देण्याबाबत निर्णय प्रतीक्षेत आहे. सत्यजित तांबे यांनीही काँग्रेस पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत. त्यांना भाजपचे समर्थन आणि शुभांगी पाटील यांना मविआचा पाठिंबा मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Nashik Election Satyajeet Tambe Audio Clip Viral Politics