नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकमध्ये महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी मोठा झटका देत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार असलेल्या मतदार संघात दोन उमेदवार उभे केले आहे. त्यांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी अवघा एक तास बाकी असतांना एबी फॅार्म दिला आहे.
शिवसेना शिंदे गटाने देवळाली विधानसभा मतदार संघात निवृत्त तहसिलदार राजश्री अहिरराव यांना उमेदवारी दिली. तर दिंडोरी विधानसभा मतदार संघामध्ये माजी आमदार धनराज महाले यांना उमेदवारी दिली आहे.
त्याचप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार गटाने सुध्दा नाशिक मध्य या विधानसभा मतदार संघातून शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांना मैदानात उतरवले आहे. त्यांना एबी फॅार्म दिला की नाही हे अद्याप समोर आलेले नाही. त्याचप्रमाणे नांदगाव विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी अगोदरच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.