नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महापालिकेची लाचखोर शिक्षणाधिकारी सुनिता धनगर हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. एका निलंबित मुख्याध्यापकाकडून तब्बल ४५ हजार रुपये घेताना धनगर हिच्यासोबत याच कार्यालयाच्या लिपीक नितीन जोशी हा ५ हजार रुपये घेताना सापळ्यात सापडला. आता या दोघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. तत्पूर्वी एसीबीच्या पथकाने धनगर हिच्या घराची झडती घेतली आहे.
नाशिकमध्ये लाचखोरीला ऊत आला आहे. त्यामुळेच दिवसागणिक विविध विभागातील लाचखोर एसीबीच्या सापळ्यात अडकत आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे हे मोठे मासे गळाला यापूर्वीच लागले आहेत. त्यात आता नाशिक मनपा शिक्षणाधिकारी सुनिता धनगर हिची भर पडली आहे. काल सायंकाळी तिला तिच्याच केबिनमध्ये एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. एका निलंबित मुख्याध्यापकाला पुन्हा सेवेत रुजू करण्यासंदर्भातील पत्र देण्यासाठी धनगर आणि जोशी यांनी लाच मागितली होती.
धनगर जाळ्यात आल्यानंतर एसीबीच्या पथकाने तिच्या घराचीही झाडाझडती घेतली आहे. आणि याच झडतीत एसीबीच्या पथकाला मोठे घबाड गवसले आहे. धनगर हिच्याकडे तब्बल ८५ लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे. सरकारी नोकरदाराकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम कशी आली, असा प्रश्न एसीबीच्या पथकाला पडला आहे. त्याचबरोबर धनगर हिच्याकडे ३२ तोळे सोने आणि २ फ्लॅट तसेच १ रिकामा प्लॉट याची कागदपत्रेही आढळून आली आहेत.
घरातच एवढे मोठे घबाड सापडल्याने एसीबीच्या पथकाकडून आता धनगर हिच्या बँक खाती आणि अन्य गुंतवणुकीकडे तपासाची दिशा वळविण्यात येणार आहे. त्यामुळे धनगर हिच्याकडे आणखी घबाड सापडण्याची चिन्हे आहेत.
Nashik Education Officer Sunita Dhangar ACB Property