नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून सेल्फी विथ टॉयलेट हा अभिनव उपक्रम राबविण्याचे सरकारने ठरविले खरे पण शाळांमधून मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने हा उपक्रम गुंडाळून ठेवण्याची वेळ जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावर आली. आता सेल्फी नव्हे तर विविध प्रकारच्या स्पर्धा घेऊन जागतिक शौचालय दिन साजरा करण्यात यावा, असे पत्र प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.डी. कनोज यांनी काढले आहेत.
केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून सेल्फीला भलतेच महत्व आले आहे. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही जातील तिथे सेल्फीच्या प्रेमात पडत असतात.किंबहुना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणाईचा आटापिटा सुरु असतो. काही सरकारी कार्यालयांमध्येही कर्मचाऱ्यांना हजेरीसाठी सेल्फी सक्तीची करण्यात आली आहे. याच सेल्फीचा जागतिक शौचालय दिनी पुरस्कार करण्याचे सरकारने ठरविले.येत्या १९ नोव्हेंबर ला जागतिक शौचालय दिन असल्याने युनिसेफ आणि सी वाय डी ए यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण राज्यात स्वच्छ शौचालय अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या अभियानातून शाळांमधील शौचालयांची स्वच्छता करून त्यासोबत सेल्फी काढण्याचे फर्मान सरकारने काढले. बरे सेल्फी पूर्ण एक दिवस नाही तब्बल आठ दिवसांचे होते.या निर्णयाला राज्यभरातील शाळांच्या शिक्षकांनी कडाडून विरोध केला.त्यामुळे सरकारला सेल्फी अभियान गुंडाळून ठेवावे लागले. त्यासंदर्भातील पत्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पाठविण्यात आले. आता सेल्फी अभियान ऐवजी विविध स्पर्धा घेण्याचे आदेश शिक्षणाधिकारी कनोज यांनी काढले आहे.
अशी असेल स्पर्धा
इयत्ता ४ थी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी पथनाट्य, चित्रकला, निबंध, वक्तृत्व या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. माझी शाळा माझे शौचालय, शौचालय वापण्याच्या पद्धती आणि मलमूत्र व्यवस्थापन या विषयांवर शाळा आणि गावपातळीवर पथनाट्य सादर केले जाणार आहे. तर माझी शाळा माझे सुरक्षित शौचालय, स्वच्छ गाव सुंदर गाव, माझ्या स्वप्नातील निर्मल ग्राम हे निबंध, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धेचे विषय आहेत.
Nashik Education Department New Order
World Toilet Day Selfie