नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिककरांसाठी आनंदवार्ता आहे. तुमच्याकडे जर ई कचरा साठलेला असेल तर त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. कारण, नाशिकमधील ई कचरा संकलनासाठी आता काही संस्थांनी पुढाकार घेतला आहे. येत्या २४, २५ आणि २६ जानेवारी रोजी हा ई कचरा आपल्याला संकलन केंद्रांवर देता येणार आहे.
आजच्या टेक्नो-सॅव्ही जगात, तंत्रज्ञानाची कास धरून आपण चुटकीसरशी कार्यालयीन, शैक्षणिक आणि वैयक्तिक कामे पार पाडत आहोत. यामुळे इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल आणि स्मार्ट गॅझेट्सचा वापर आणि खप प्रचंड प्रमाणात वाढला असून त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक वेस्ट अर्थात ई-कचरा अखंडपणे निर्माण होत आहे. मात्र पर्यावरणपूरक पद्धतीने याचे निःसारण होत नसल्याचे चित्र सर्वसामान्य आहे !! अवैज्ञानिक पद्धतींनी ई-कचऱ्याची हाताळणी केल्याने हवा, पाणी आणि मातीचे प्रदूषण होते आहे. ज्यामुळे मानवी आणि पर्यावरणीय आरोग्यावर परिणाम होतोय.
येत्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, Computer Society of India (CSI) नाशिक चॅप्टर, पूर्णम इकोव्हिजन पुणे आणि पर्यावरण संरक्षण ग्रुप यांच्या संयुक्त प्रयत्नांतून “ई-यंत्रण” ही ई-कचरा संकलन मोहीम राबविण्यात येत आहे. नासिक मधील सर्व ओद्योगिक संस्था, शैक्षणिक संस्था, रहिवासी सोसायटी यांना पुढे येऊन “ई-कचरा संकलन केंद्र” म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आपल्या कार्यालयातील, संस्थेतील आणि घरातील ई-कचरा, २४, २५ आणि २६ जानेवारी २०२३ या दिवसांमध्ये, आपल्या जवळच्या ई-कचरा संकलन केंद्रावर नेवून देण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
नासिकमध्ये प्रथमच अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अणेक मोठ्या औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थांनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे. या मोहिमेचा शुभारंभ, राष्ट्रीय युवा दिन अर्थात स्वामी विवेकानंद जयंती १२ जानेवारी २०२३ रोजी, नासिक फर्स्ट, ट्रॅफिक एज्युकेशन पार्क, मुंबई नाक्याजवळ, येथे संध्याकाळी ५. ३० वाजता संपन्न होत असून यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आलेले आहे.
Nashik E Waste Collection Initiative by Various Organizations