नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शरद पवार हे आमचे श्रद्धा स्थान आहेत. माझ्या दालनात देखील त्यांचा फोटो आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे पत्रकारांशी संवाद साधला. खाते वाटप होताच अजित पवार यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट दिली. यासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले की, आपली परंपरा आहे, आपण कुटुंबाला महत्त्व देतो. मला आई वडिलांनी शिकवले आहे. मी काल काकींची (प्रतिभा पवार) भेट घेतली. त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यांच्या तब्ब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी गेलो. माझ्या अंतर्मनाने मला सांगितलं, मी भेटलो. त्यावेळेस शरद पवार साहेब, सुप्रिया सुद्धा होत्या. यावेळेस पवार साहेबांनी मला शिक्षणाच्या संदर्भात पत्र दिले असे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाबाबत बोलतांना अजित पवार म्हणाले की, चिंता करू नका आगामी निवडणुकांपर्यंत पक्ष, चिन्हं, एबी फॉर्म सगळं सोष्ट होईल. राष्ट्रवादी काँग्रेसला बळकट करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू. विरोधी पक्षाच्या प्रश्नावर बोलतांना ते म्हणाले की, विरोधी पक्षनेते बाबत अध्यक्ष निर्णय घेतील. अधिवेशनाच्या काळात ही नियुक्ती होत असते.
प्रशासकीय कामाबाबत बोलतांना पवार म्हणाले की, प्रशासन लोकाभिमुख होण्यासाठी प्रयत्न करू. भरती संदर्भात आढावा घेतला जाईल. कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करु, माझ्या लेव्हल पर्यंत असल्यास मी निर्णय घेईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमु्ख्यमंत्री फडणवीस देखील मदत करतील. शेतकऱ्याला जिथे दोन पैसे जास्त मिळतील, तिथे माल विकण्याचा अधिकार आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही शासन म्हणून उभे राहू. आम्ही सर्व घटकांना प्रतिनिधित्व दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
समान नागरी कायदा बाबत आपली भूमिका स्पष्ट करतांना ते म्हणाले की, समान नागरी कायद्याचा ड्राफ्ट पाहिल्यावर आम्ही आमची भूमिका मांडू. कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही, अशी आमची भूमिका आहे. ३७० कलम काढलं, चांगली गोष्ट झाली.समान नागरी कायद्याचा ड्राफ्ट जर संपूर्ण देशाच्या भल्याचा असेल, तर विचार करू, असे त्यांनी स्पष्ट केले.