नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकचे द्वारका हॉटेलची ओळख सर्वदूर असून या शहरातील अतिशय महत्वाच्या ठिकाणी आयकॉनिक बिझनेस सेंटर प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे नाशिकच्या विकासाला बळकटी मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. द्वारका हॉटेलच्या जागेत साकारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आयकॉनिक बिझनेस सेंटर प्रकल्पास पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये आपण निर्माण केलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे नाशिक शहरचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे नाशिक शहराला आता वेगळी ओळख निर्माण करत आहे. नाशिक शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून याठिकाणी उद्योग व्यवसायाला अधिक संधी निर्माण झाल्या आहे. त्यामुळे विविध प्रकारचे प्रकल्प याठिकाणी साकारले जात आहे. नाशिकमध्ये साकारण्यात येत असलेले आयकॉनिक बिझनेस सेंटर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे होत असल्याने नाशिकच्या विकासाला अधिक चालना मिळणार असल्याने नाशिककडे गुंतवणूकदारांचा कल वाढणार आहे. परिणामी नाशिक शहराच्या विकासाला अधिक चालना मिळणार असल्याचे यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
यावेळी आयकॉनिक बिझनेस सेंटरचे संचालक दिपक बागड म्हणाले की, नाशिक शहरात निर्माण झालेल्या पायाभूत सुविधांमुळे मुंबई पुण्यासारख्या शहरांच्या बरोबरीने नाशिक पुढे येत आहे. याठिकाणी मंत्री छगन भुजबळ यांनी तयार केलेला चौपदरी उड्डाणपूल, विमानतळ, पर्यटनाच्या व दळणवळणाच्या पायाभूत सुविधा आणि उद्योगांचा केलेला विकास बघता याठिकाणी गुंतवणुकीच्या अनेक संधी उद्योजकांना निर्माण होत असल्याने द्वारका सारख्या अतिशय महत्वपूर्ण ठिकाणी आम्ही आयकॉनिक बिझनेस सेंटरची मुहूर्तमेढ रोवली असून याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, अनिता भामरे, समाधान जेजुरकर, आयकॉनिक बिझनेस सेंटरचे संचालक दिपक बागड, धनंजय बागड यांच्यासह क्रेडाईचे अनंत राजेगावकर, विलास शहा, सुनील कोतवाल, सुनील हेकरे, किशोर वानखेडे, सतीश शानबाग यांच्यासह आयकॉनिक बिझनेस सेंटर पदाधिकारी उपस्थित होते. बघा या प्रकल्पाचा व्हिडिओ