नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जगातील सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या आणि शारीरिक व मानसिक क्षमतेचा अंत पाहणाऱ्या “अल्ट्रामॅन” ही स्पर्धा डॉ सुभाष पवार यांनी यशस्वीरित्या जिंकली आहे. मेक्सिकोतील कोझुमेल बेटावर ही स्पर्धा झाली. या यशाद्वारे ते भारतातील एकमेव वयोवृद्ध “अल्ट्रामँन” बनले आहेत.
अतिशय थडतर स्पर्धा
ही स्पर्धा 3 दिवसांची असते. त्यात पहिल्या दिवशी 10 कि.मी .स्विमिंग व 145 कि.मी .सायकलिंग असून त्यांनी 14.13 तासात हे अंतर पुर्ण केले. दुसऱ्या दिवशी 280 की .मी . सायकलिंग 13.13 तासात व तिसऱ्या दिवशी 85 की .मी . रनिंग 13.41 तासात पुर्ण करुन डॉ सुभाष पवार यांनी ही एकूण स्पर्धा 41.09 तासात जिंकली. जगातील विविध देशातील स्पर्धकांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला होता . स्पर्धेच्या सुरवातीलाच स्विमिंग सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासातच समुद्रात वादळ सुरू झाले आणि ते वाढतच गेले. 6 ते 7 फुटाच्या लाटा तयार झाल्या. त्यामुळे सर्वच स्पर्धकांना स्विमिंग करतांना लाटांच्या व वाऱ्याच्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागले. आयोजकांनी स्विमिंग बंद न करता चालू ठेवण्याचा निर्णय घेतला.
सायकलिंग व रनिंगलाही प्रचंड उष्णता व 90% आद्रता ह्यामुळे स्पर्धकांची स्पर्धा पुर्ण करतांना चांगलीच दमछाक झाली, त्यामुळे निर्धारित वेळेच्या आत केवळ एक स्पर्धक वगळता कोणालाही रनिंग ची स्पर्धा वेळेत पूर्ण करता आली नाही. डॉ पवार यांनीही हिम्मत न सोडता व होणाऱ्या त्रासाचा विचार न करता स्पर्धा पुर्ण केली. त्यामुळे वयाच्या 67 व्या वर्षी “ अल्ट्रामँन ” ही स्पर्धा पुर्ण करणारे एकमेव वयोवृद्ध भारतीय बनले आहेत. ते नोव्हेंबर 2021 मध्ये मेक्सिकोतील आयर्नमॅन स्पर्धेतही भाग घेणारे भारतातील सर्वात वयस्कर स्पर्धक ठरले होते.
डॉ. सिंगल यांच्याकडून प्रेरणा
आयर्नमॅन स्पर्धेच्या अडीच पट अधिक ही स्पर्धा असते. आयर्नमॅन स्पर्धेत साधारण 2500 स्पर्धक जगभरातून भाग घेतात तर फक्त 30 ते 40 स्पर्धक ह्या स्पर्धेत भाग घेण्याचे धैर्य दाखवतात किंवा निवडले जातात. ह्यावरून स्पर्धेचे स्वरूप लक्षात येते. 5 वर्षांपूर्वी डॉ सुभाष पवार ह्यांनी नाशिकचे पोलिस आयुक्त मा. रविंद्र सिंगल आयर्नमॅन झाल्याची बातमी वाचली व त्याने प्रेरित होऊन आपणही आयर्नमॅन स्पर्धेसाठी प्रयत्न करावा असा निश्चय वयाच्या 62 व्या वर्षी करून व्यायामाला सुरुवात केली. त्यावेळी नाशिकमध्ये या स्पर्धेसाठी कोणी प्रशिक्षकही नव्हते. परंतु त्यांनी जेथून जिथून माहिती मिळेल त्या पद्धतीने ती घेऊन प्रयत्न चालू ठेवले. लहान मोठ्या स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली.
सातत्याने प्रयत्न
आधी आयर्नमॅनच्या पाऊणपट असलेली टायगरमॅन ही नागपूर ही स्पर्धा निर्धारित वेळेच्या दीड तास आधीच 2019 ह्या वर्षी जिंकली. नंतर 2021 ह्या वर्षी मेक्सिको येथील आयर्नमॅन ही स्पर्धा वेळेच्या दोन तास आधीच जिंकुन भारतातील सर्वात वयस्कर आयर्नमॅन झाले होते. जानेवारी 2023 मध्येही त्यांनी कोकणातील ” कुंडलिका ” ही 80 कि. मी. ची अवघड घाटातील स्पर्धा निर्धारित वेळेच्या 2 तास आधीच जिंकली होती. अमेरिका येथे सॉ्टवेअर इंजिनियर असलेले डॉ सुभाष पवार यांचे सुपुत्र श्री रोहित पवार यांनी सुद्धा दोन वेळा आयनमॅन ही स्पर्धा जिंकली असून याच वर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये रोहित याने अल्ट्रामॅन ह्या स्पर्धेत अमेरिकेतील फ्लोरिडा येथे भाग घेतला व ती फक्त 27.56 तासात जिंकून भारतातील सर्वात वेगवान अल्ट्रामॅन ठरले .
सातपूरला रुग्णसेवा
डॉ सुभाष पवार हे सातपूर येथील रोहित मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक असून पुढेही अशा अवघड स्पर्धांमधून वय व फिटनेस जोपर्यंत साथ देईल तोपर्यंत भाग घेण्याचा त्यांचा निर्धार आहे. नाशिकमधून आयर्नमॅन सारखेच अजून “ अल्ट्रामँन ” तयार व्हावेत अशी त्यांची इच्छा असून त्यासाठी ते मार्गदर्शन देखील करणार आहेत.
Nashik Dr Subhash Pawar Ultraman Winner