नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – द्वारका ते दत्तमंदिर दरम्यान उड्डाणपूल झाल्यानंतरही भविष्यात वर्षानुवर्ष शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून खा. हेमंत गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येऊ लागले आहे. दोन मार्गिकेंसह शहरात एकूण बत्तीस किलोमीटर मेट्रो प्रस्तावित आहे. त्यापैकी द्वारका -दत्तमंदिर या दरम्यान प्रस्तावित असलेली मेट्रो आता द्वारका ऐवजी सारडा सर्कल आणि दत्तमंदिर ऐवजी थेट नाशिकरोड रेल्वे स्टेशनपर्यंत प्रस्तावित करण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या विचाराधिन असून या विषयीचा सुधारित प्रस्ताव महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने राज्य शासनाकडे नुकताच पाठविला आहे. केंद्र शासनाचा हा पथदर्शी प्रकल्प असून सारडा सर्कल ते थेट नाशिकरोड रेल्वेस्टेशन पर्यंत डबल डेकर मेट्रो झाल्यास पुढील वर्षानुवर्ष शहरात वाहतुकीची समस्या उद्भवणार नसल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
शहरातील वाहतुकीच्या कोंडीवर उपाय म्हणून द्वारका -दत्तमंदिर उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो असा प्रस्ताव प्रस्तावित आहे. या प्रस्तावासाठी खा. गोडसे यांनी यापूर्वीच शहरातून जाणाऱ्या द्वारका – दत्त मंदिर या दरम्यानच्या सुमारे सहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे भारतमाला योजनेत वर्गीकरण करून घेतलेले आहे. परंतु दिवसेंदिवस शहराची झपाट्याने वाढत चाललेली लोकसंख्या पाहता द्वारका -दत्तमंदिर हा उड्डाणपूल आणि त्यावर डबल डेकर मेट्रो झाल्यास काही वर्षांनी पुन्हा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होवू शकतो.यावर मात करण्यासाठी म्हणून सुधारित डीपीआर तयार करण्याची मागणी खासदार गोडसे यांनी राज्य आणि केंद्र शासनाकडे काही महिन्यांपासून लावून धरली होती.
नाशिकरोड ते पुणे या हायस्पीड लोहमार्गाचे काम लवकर सुरू होवून येत्या काही वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. यातून नाशिकरोड,नाशिक परिसर मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या वाहतूकीवर मात करण्यासाठी व्दारका- दत्तमंदिर ऐवजी सारडा सर्कल ते थेट नाशिकरोड रेल्वे स्टेशनपर्यत डबल डेकर मेट्रो असणे किती गरजेचे असल्याचे खा.गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्राच्या नगरविकास मंत्रालयाला पटवून दिलेले होते.
खा.गोडसे यांच्या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रिय नगरविकास तसेच पंतप्रधान कार्यालयाकडे याविषयीचा पत्रव्यवहार केलेला आहे. खा. गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने प्रस्तावित मेट्रो मार्गात काही बदल करण्याचा विचार केंद्रशासन करत आहे. विविध कारणांमुळे पुढील काही वर्षानंतर शहरात उद्भवणाऱ्या वाहतूकीच्या समस्येवर मात करण्यासाठी द्वारका ऐवजी सारडा सर्कल आणि दत्तमंदिर ऐवजी नाशिकरोड असा सारडा सर्कल ते थेट नाशिकरोड रेल्वेस्टेशन पर्यत डबल डेकर मेट्रो प्रकल्प उभारण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन असून या विषयीचा सविस्तर सुधारित डीपीआर नुकताच महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने राज्य शासनाकडे नुकताच पाठविल्याची माहिती खा.गोडसे यांनी दिली आहे.
Nashik Double Decker Metro Project